NRI Crime News: आंध्र प्रदेशातून हत्येचे एक भयंकर प्रकरण समोर आले असून, त्याबद्दल सगळीकडेच चर्चा होत आहे. आपल्या 12 वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचा बदला घेण्यासाठी कुवेतहून भारतात एक व्यक्ती आली. कुवेतहून आलेल्या या अनिवासी भारतीयाने एक निर्घृण हत्या केली आणि तो कुवेतला परतला. नंतर त्याने स्वतः त्याच्या यूट्यूब चॅनलवर गुन्ह्याची कबुली दिली. आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा व्यक्ती 15 वर्षांपासून कुवेतमध्ये काम करत होता. तो स्वत:चे यूट्यूब चॅनलही चालवतो.
या व्यक्तीने व्हिडीओमध्ये संपूर्ण घटना तपशील देऊन सांगितली आहे. ही व्यक्ती अनेक दिवसांपासून कुवेतमध्ये राहत होती. त्याची मुलगी आणि पत्नीही त्याच्यासोबत कुवेतमध्ये राहत होत्या पण नंतर त्याने आपल्या मुलीला आंध्र प्रदेशात तिच्या मावशीकडे पाठवले. आपल्या मुलीच्या संगोपनासाठी तो नातेवाईकांना पैसेही देत असे. पत्नीची बहीण आणि तिच्या पतीने सुरुवातीला मुलाची चांगली काळजी घेतली. त्यानंतर नुकतेच मुलीची आई तिच्या मुलीला भेटायला आली असता, तिच्या मावशीच्या सासरच्या मंडळींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले.
हे ही वाचा: सर्वात उंच हॉटेल...105 रूम्स, पण 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या 'या' वास्तूमध्ये कोणीच येत नाही, कारण...
यानंतर आई आणि मुलीने स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ते करून घेतले नाही. आरोपींना पोलिसांनी इशारा देऊनच सोडून दिले. या व्यक्तीने सांगितले की, त्यानंतर त्याने कायदा हातात घेण्याचे ठरवले आणि कुवेतहून भारतात आला. येथे त्याने आपल्या मुलीच्या बलात्कार करणाऱ्याची लोखंडी रॉडने हत्या केली आणि नंतर कुवेतला परतला. त्यानंतर तिकडे जाऊन गुन्हाचा आणि त्याच्या कबुलीजबाबाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला.
हे ही वाचा: Fridge Vastu Tips: 'या' 5 गोष्टी चुकूनही फ्रीजवर ठेवू नका, घरातून निघून जाईल सुख-समृद्धी
दुसरीकडे पोलीस उपनिरीक्षक पी महेश यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही याबद्दल नकार दिला आहे. उलट त्यांनी सांगितले की, "मुलीची आई आणि तिच्या बहिणीमध्ये कौटुंबिक वाद होता. आता आरोपी वडील वेगळीच स्टोरी सांगत आहेत. या हत्येत मुलीच्या वडिलांशिवाय इतर नातेवाईकांचाही हात आहे. तपासानंतर लवकरच सत्य समोर येईल. तसेच आरोपी वडील व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला आत्मसमर्पण करायचे होते तर खून करून तो कुवेतला का परतला? आता आम्ही त्याला कुवेतमधून परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत."