Job News : कोरोना काळापासूनच जगभरात अनेक गोष्टी बदलल्या. जीवनशैलीपासून अनेक ठिकाणी नोकरीचंही स्वरुप बदललं. कार्यालयांमध्ये जाऊन काम करणारे अनेक कर्मचारी तासनतास घरीच काम करु लागले. हळुहळू वातावरण पूर्ववत झालं आणि काही कंपन्यांनी WFH अर्थात वर्क फ्रॉम होम किंवा घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Hybrid किंवा पूर्णपणे हजेरी तत्त्वावर नोकरीवर पुन्हा बोलवून घेतलं. काही कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. तर, काही कर्मचारी मात्र अद्यापही घरातूनच काम करताना दिसत आहेत.
कंपनीनं अनेकदा सांगून, आदेश देऊनही घरातूनच काम करणाऱ्या अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी आता भारतातील अग्रगणी सॉफ्टवेअर कंपनी टीसीएस कठोर पावलं उचलताना दिसत आहे. कंपनीकडून काढण्यात आलेलं एक फर्मान त्याचा एक भाग आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीची भाषा करण्यात आल्यामुळं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
HR विभागाकडून वारंवार कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये येऊन काम करण्याचे निर्देश देऊनही त्याचं पालन होत नसल्यामुळं आता TCS कडून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाच एक भाग असणारा बोनस/ वेरिएबल पे नाकारण्याचा नियम तयार केला आहे. त्रैमासिक अहवालानंतर कर्मचाऱ्यांच्या हजेरीच्या पार्श्वभूमीवर चार विभाग तयार करण्यात आले आहेत. या हजेरीच्याच आधारे कर्मचाऱ्यांना वेरिएबल पे ची रक्कम देण्यात येईल अथवा नाकारली जाईल.
टीसीएस (TCS) च्या नव्या नियमानुसार कर्मचारी किती दिवस नोकरीवर येतोय यावर ही रक्कम आधारित असेल. या नियमाच्या अनुषंगानं, 60% हून कमी हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार नाही. 60-75% टक्के हजेरी असणाऱ्य़ा कर्मचाऱ्यांना 50 टक्के बोनस आणि 75-85% हजेरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के बोनस देण्यात येणार आहे. 85% किंवा त्याहून जास्त हजेरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नसून त्यांना बोनसची 100 टक्के रक्कम मिळणार आहे.
एखाद्या कर्मचाऱ्यानं सातत्यानं या नियमांची पायमल्ली केल्यास त्यांच्याविरोधात कंपनीकडून कठोर पावलं उचलण्यात येणार आहेत. त्यामुळं आता टीसीएसमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.