Manvi Death : पंजाबच्या पटियालामध्ये गेल्या महिन्यात 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. मृत मुलीचं नाव मानवी (Maanvi) असं होतं. मानवीच्या वाढदिवसासाठी तिच्या कुटुंबियांनी ऑनलाइन केक (Birthday Cake) मागवला होता. तो खाल्ल्यानंतर मानवीची प्रकृती खालावली. मानवीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच मानवीचा मृत्यू झाला होता. मानवीच्या कुटुंबाने ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्लिकेशनद्वारे केकची ऑर्डर दिली होती. केक खाल्ल्यानंतर मानवीसह कुटुंबातील अनेकांची प्रकृती खालावली. दुसऱ्या दिवशी मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने तीला रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांकडून तिला मृत घोषित करण्यात आलं.
काय होतं केकमध्ये?
मानवीच्या मृत्यूनंतर केकचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याचे रिपोर्ट आल्यानंतर मानवीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. या केकमध्ये कृत्रिम सॅकरिन वापरण्यात आलं होतं. याला सिंथेटिक स्वीटनर (Synthetic Sweetener)म्हणतात. केक गोड बनवण्यासाठी याचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केकमध्ये सिंथेटिक स्विटनरचा वापर जास्त प्रमाणात करण्यात आला होता. सिंथेटिक स्विटनरमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे आरोग्याला धोकाक पोहोचू शकतो.
आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय जिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार केकचे एकूण चार नमुने पाठवण्यता आले होते. यापैकी दोन नमुने सदोष आढळले. केकमध्ये कृत्रिम सॅकरिनचा वापर करण्यात आला होता. तपासाच्या आधारे एक रिपोर्ट तयार केला जात असून तो कोर्टात सादर केला जाणार आहे. याप्रकरणी ज्या बेकरीतून हा केक आला होता, त्या बेकरीविरुद्ध याआधीच एफआयआर दाखल करण्याता आला आहे.
सिंथेटिक स्वीटनर म्हणजे काय?
सिंथेटिक स्वीटनर अर्थात कृत्रिम स्वीटनर हे नैसर्गिक साखरेसाठी पर्याय म्हणून वापरे जातात. नेहमीच्या साखरेपेक्षा कृत्रिम स्वीटनर अनेक पटींनी गोड असतात. डायट सोडा, शुगर-फ्री कँडीज आणि लो-कॅलरी भाजलेले पदार्थ यासह विविध खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये सिंथेटिक स्वीटनरचा वापर केला जातो.
काय आहे नेमकं प्रकरण?
24 मार्च 2024 रोजी 10 वर्षांच्या मानवीच्या वाढदिवसानिमित्ताने पटियालातील एका बेकरीतून ऑनलाईन चॉकलेट केक ऑर्डर करण्यात आला. पण केक खाल्यानंतर मानवीची तब्येत ढासळली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात मानवी आपल्या कुटुंबासह वाढदिवसाचं सेलेब्रेशन करताना दिसत आहे. केक खाल्ल्यानंतर मानवीला उल्ट्या होऊ लागल्या. गळा सुकत असल्याचं तीने आपल्या आईला सांगितलं. त्यानंतर तिला कुटुंबियांनी रुग्णालयात नेलं. पण काही वेळातच तिचा मृत्यू झाला.