काश्मीरमध्ये शाह फैसल यांच्या नव्या पक्षाची स्थापना, इम्रान खान यांचे कौतुक

जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर शांततापूर्ण आणि स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन

Updated: Mar 17, 2019, 06:38 PM IST
काश्मीरमध्ये शाह फैसल यांच्या नव्या पक्षाची स्थापना, इम्रान खान यांचे कौतुक title=

श्रीनगर: केंद्र सरकारच्या काश्मीरविषयक धोरणाला कंटाळून भारतीय प्रशासकीय सेवेचा (आयएएस) राजीनामा देणारे सनदी अधिकारी शाह फैसल यांनी रविवारी जम्मू अँण्ड काश्मीर पीपल्स मुव्हमेंट या राजकीय पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्ष शेहला रशीद हिनेदेखील या पक्षात प्रवेश केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शेहला रशीद हिने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दोघांनी केलेल्या संघर्षाचे कौतुक केले. तर शाह फैसल यांनी जम्मू अँण्ड काश्मीर पीपल्स मुव्हमेंट पक्षाचे व्हिजन डॉक्युमेंटही सादर केले. यामध्ये जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर शांततापूर्ण आणि स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच कलम ३५ अ वरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरही पक्षाकडून भूमिका मांडण्यात आली. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, असे या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वी शाह फैसल नॅशनल कॉन्फरन्स पक्षात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, ही चर्चा आता निकालात निघाली आहे. दरम्यानच्या काळात शाह फैसल यांनी काश्मीर खोऱ्याचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी अनेक समविचारी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. 

जम्मू-काश्मीर खोऱ्यातील बदलत्या सकारात्मक परिस्थितीचा चेहरा म्हणून शाह फैसल यांच्याकडे पाहिले जात होते. २००९ साली झालेल्या आयएएस परीक्षेत फैसल देशातून पहिले आले होते. अशी कामगिरी करणारे ते पहिले काश्मिरी ठरले होते. त्यामुळे ते उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या सुशिक्षित काश्मिरी तरुणाईचा चेहरा झाले होते. परंतु, त्यांनी दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारच्या काश्मीरविषयक धोरणावर ताशेरे ओढत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. केंद्र सरकार काश्मीरच्या जनतेला विश्वासात घेण्याच्यादृष्टीने पुरेसे प्रयत्न करत नसल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखविली होती. काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द करण्यासाठी कारस्थाने रचली जात आहेत. भारतात जहाल राष्ट्रावादाच्या नावाखाली असहिष्णू वातावरण वाढीस लागल्याची टीका फैसल यांनी केली होती. तसेच काश्मीर खोऱ्यात निष्पाप नागरिकांच्या होणाऱ्या हत्येवरून त्यांनी सरकारचा निषेध केला होता.