लग्नाच्या दिवशीच वधुची पार्लरमध्ये हत्या, आता प्रियकरानेही उचलले टोकाचे पाऊल

Crime News In Marathi: झांसी येथे लग्नाच्या दिवशीच वधुची हत्या करण्यात आली आहे. आता या आरोपीनेदेखील स्वतः आत्महत्या केली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 26, 2024, 06:02 PM IST
लग्नाच्या दिवशीच वधुची पार्लरमध्ये हत्या, आता प्रियकरानेही उचलले टोकाचे पाऊल  title=
crime news in marathi The man who killed the bride in beauty parlour committed suicide

Crime News In Marathi: झांसीमध्ये लग्नाच्या दिवशीच ब्युटी पार्लरमध्ये तयारी करण्यासाठी गेलेल्या नवरीची गोळी मारून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीने मध्य प्रदेशमधील एका लॉजमध्ये फाशी घेत आत्महत्या केली आहे. वधुच्या हत्येनंतर आरोपी फरार होता. पोलिस त्याचा सगळीकडे शोध घेत होते. त्यासंदर्भात सीसीटिव्ही फुटेजदेखील पोलिसांनी जप्त केले होते.

मध्य प्रदेश येथील दतिया जिल्हा येथील काजल हिचा 23 जून रोजी झांसी येथे विवाह होणार होता. ती लग्नासाठी तयार होण्यासाठी ब्युटी पार्लरला गेली होती. तेव्हाच तिच्या गावात राहणारा दीपक तेथे पोहोचला आणि काजलवर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तो फरार झाला. 25 जून रोजी संध्याकाळी पोलीसांना काशीबाई धर्मशालामध्ये दीपकने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

काजलची बहिण नेहाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रागाच्या भरात वारंवार म्हणत होता ती काजलने त्याला धोका का दिला? त्याला काजलला त्याच्यासोबत घेऊन जायचं होतं. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिच्यावर गोळी झाडली. गोळी झाडल्याच्या आवाजानंतर परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली. काजलला उपचारांसाठी झांसी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपीहा वधुचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येतंय. 

आरोपी आणि काजल दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होते. ते दोघं एकाच गावात राहत होते. दोघांमध्ये काय वाद होते व आरोपीने इतके मोठे पाऊल का उचलले, याची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपीनेही आत्महत्या का केली याचा तपास पोलिसही करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. 

दरम्यान, वसईतही असाच एक प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वी वसईत एका 20 वर्षीय तरुणीच्या डोक्यात पाना घालून तिची हत्या करण्यात आली होती. प्रेमप्रकरणातून ही हत्या घडली होती. दिवसाढवळ्या सगळ्यांदेखत आरोपीने तरुणीचा निर्घृण खून केला होता.