कोरोनावर 'कडक' उपाय! कोरोना रुग्णांसाठी ठरणार 'इम्युनिटी बूस्टर'

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तज्ज्ञांकडून वारंवार सूचना केल्या जातात, अशातच आता एक नवी माहिती समोर आली आहे

Updated: Jul 9, 2021, 10:04 PM IST
कोरोनावर 'कडक' उपाय! कोरोना रुग्णांसाठी ठरणार 'इम्युनिटी बूस्टर' title=

मुंबई : कोरोना काळात (Coronavirus) ज्यांची रोग प्रतिकारशक्ती (Immunity) चांगली आहे त्यांनी कोरोनावर मात केली. तज्ज्ञांकडूनही रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय आहार असायला हवा, काय काळजी घ्यायला हवी याच्या वारंवार सूचना केल्या जातात. अशातच आता एक नवी माहिती समोर आली आहे. 

आहारात कडकनाथ कोंबडीचा वापर केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, असा दावा मध्य प्रदेशातील झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर (kadaknath research center MP) आणि कृषि विज्ञान केंद्राने केला आहे. यांसदर्भातलं एक पत्र त्यांनी इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (ICMR) पाठवलं आहे. झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटरने दावा केला आहे की आहारात कडकनाथ कोंबडीचा वापर केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल. कडकनाथ कोंबड्यांच्या मांसातून प्रोटीन, विटामिन, झिंक आणि लो फॅट मिळत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसंच कोलेस्ट्रॉल फ्री असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. 

कोरोना काळात आणि कोरोना होऊन गेल्यानंतर आहारात कडकनाथ कोंबडीचा वापर केल्यास रुग्णांच्या प्रकृतीला याचा मोठा फायदा होऊ शकतो असंही या पत्रात म्हटलं आहे. या पत्रासोबत नॅशनल मीट रिसर्च सेंटर आणि मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालच्या प्रतीही जोडण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्णांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी होत असल्यांचं दिसून आलं आहे. त्यासाठी हाय प्रोटीन आहार महत्त्वाचा असल्याचं बोललं जातं. त्यामुळे कडकनाथ कोंबडी त्याला योग्य पर्याय ठरेल असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, आयसीएमआरनं अजूनपर्यंत यावर कोणतही परीक्षण केलेलं नाही. त्यामुळे आता आयसीएमआर यावर काय निर्णय देतं याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.