श्रीनगर: नुकतच लग्न झाल्यानंतर एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ हवा असतो. वर्षभर का होईना पण एकमेकांचा सहवास खूप जास्त महत्त्वाचा असतो. ते नाजूक क्षण आयुष्यभर पुरतात. मात्र लग्नानंतरची सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. हातावरची मेहंदी उतरेपर्यंत आपल्याच हातातील चुडा आपल्याला उतरवावा लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. जम्मू-काश्मीरच्या पूंछ इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 23 सिख रेजिमेंटचे जवान गज्जन सिंह शहीद झाले.
गज्जन सिंह यांचं फेब्रुवारीत नुकतच लग्न झालं होतं. त्यांनी आपल्या पत्नीची साथ न सोडण्याचं वचनही दिलं होतं. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. दोन महिन्यांपूर्वी गज्जन सिंह आपल्या भावाच्या लग्नासाठी घरी परत आले तेवढीच ती शेवटची भेट झाली. त्यानंतर जवान गज्जन सिंह आले ते तिरंग्यामध्ये. हरप्रीतच्या हातावरचा नवा कोरा लग्नाचा चुडाही उतरला नव्हता आणि जवान गज्जन सिंह यांचं पार्थिव दारात होतं.
मन घट्ट करत हरप्रीत सिंह एकटक आपल्या जवान पतीच्या पार्थिवाकडे पाहात होत्या. त्यांच्या अश्रूंना बांध फुटला आणि त्यांनी पार्थिवाला पकडून ओए उठ जा... म्हणत हंबरडा फोडला. माझ्याकडे एकदा तरी बघ उठ एकदा तरी बघ म्हणत त्यांनी हा हंबरडा फोडला. जवान गज्जन सिंह यांच्या जाण्याने कुटुंबासह संपूर्ण गावात शोकाकूल वातावरण आहे.
पत्नी हरप्रीत यांची अवस्था पाहून अंगावर काटा येतो. शहीद जवान गज्जन सिंह यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लग्न होऊन वर्षही सरलं नसेल आणि आपल्या पतीचं पार्थिव पाहून हरप्रीत यांना मोठा धक्का बसला होता.
हरप्रीतची अवस्था पाहून तर गावकरीही हतबल झाले होते. लग्नानंतर अवघ्या 7 महिन्यांतच आपल्या पतीचं पार्थिव तिरंग्यात आलेलं पाहून हरप्रीतनं हंबरडा फोडला. गज्जन सिंह यांचे वडील चरण सिंह या धक्क्यातून स्वत:ला सावरू शकत नव्हते. संपूर्ण सिंह कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला होता.