श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील स्थानिक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु झाली असून दुपाऱपर्यंत संपूर्ण निकाल हाती येईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटरमध्ये ही मतमोजणी सुरु आहे. जम्मूतील शहरी स्थानिक निवडणुकीची मतमोजणी विक्रम चौक येथील पॉलिटेक्निक इंस्टीट्यूटमध्ये सुरु आहे. राज्यातील इतर 5 जिल्ह्यांमध्ये देखील मतमोजणी सुरु आहे.
काश्मीरच्या गनी मोहल्ला, खानपोरा, वहादतपोरा, बाजार मोहल्ला, करीपोरा आणि खारपोरा वॉर्डमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे तर नरीसपोरा, हाउसिंग कालोनी ओमपुरा, डोबी मोहल्ला आणि मोहनपुरा वॉर्डमध्ये भाजपने विजय मिळवला आहे.
राज्यात मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्यात 13 वर्षानंतर स्थानिक पातळीवर निवडणुका झाल्या आहेत. एकूण 4 टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. खोऱ्यात कमी मतदान झालं आहे. पण जम्मू आणि लद्दाखमध्ये चांगलं मतदान झालं आहे. काश्मीरच्या 598 वॉर्डपैकी 231 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यात एकूण 35.1 टक्के मतदान झालं आहे.
नॅशनल कॉन्फ्रेंस, पीडीपी आणि कम्यूनिस्ट पक्षाने चार टप्प्यांमध्ये झालेल्या या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मंगळवारी म्हटलं होतं की, 'नॅशनल कॉन्फ्रेंस आणि पीडीपीने निवडणुकीवर बहिष्कार टाकायला नको होता. संविधानाच्या कलम 35ए आणि 370 या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा नव्हता.' या दोन्ही पक्षाने या मुद्द्यावर निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.