Terrorists Encounter in Jammu: देश हादरवण्याचा प्रयत्न अपयशी; पाकिस्तानातून आलेल्या दहशवाद्यांचा भारतीय सैन्याकडून खात्मा

Terrorist Encounter In Jammu : प्रजासत्ताक दिनाच्या ( India Republic Day 2023) पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने मोठ्या प्रमाणात तपास सुरु केला आहे. हाय अलर्टदरम्यान सुरक्षा अधिकाऱ्यांनी एका ट्रकला थांबवले तर त्यातून गोळीबार सुरु झाला. प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

Updated: Dec 29, 2022, 10:34 AM IST
Terrorists Encounter in Jammu: देश हादरवण्याचा प्रयत्न अपयशी; पाकिस्तानातून आलेल्या दहशवाद्यांचा भारतीय सैन्याकडून खात्मा title=

Terrorist Encounter In Jammu​ : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) वाहनांच्या तपासणीदरम्यान भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश हाती आलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या (republic day 2023) पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट देण्यात आला असून मोठ्या प्रमाणात सैन्य रस्त्यावर उतरून तपासणी करत आहे. यादरम्यानच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा घेऊन जाणाऱ्या चार दहशतवाद्यांना कंठस्थान (Terrorist Encouter) घालण्यात भारतीय सैन्याला (Indian Army) यश आलं आहे. भारतीय सैन्याने चकमकीत या चार दहशतवाद्यांचा खात्मा केला असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या मोठ्या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली काश्मीर मुद्द्यावरुन एक बैठक देखील पार पडली आहे. या बैठकीत रॉ, एनआय, एलएसजी प्रमुखांनी काश्मीर खोऱ्यासंदर्भातील सुरक्षेसंदर्भात आढावा घेतला आहे.

धुक्याचा आधार घेत ट्रकचालक फरार

जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशवाद्यांना नुकतीच केलेली अटक आणि  नोव्हेंबरमध्ये नरवाल बायपासजवळ एक तेल वाहून नेणाऱ्या टॅंकरमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पकडल्यानंतर सुरक्षादलांनी मोठ्या प्रमाणात तपास सुरु केला होता. याच पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांनी जम्मू - काश्मीर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तपासणी करताना सिध्रा बायपासजवळच्या तावी पुलावर एका ट्रकला थांबवले. या ट्रकमध्ये चार दहशतवादी मोठ्या शस्त्रसाठ्यासह लपून बसले होते. सुरक्षा रक्षकांनी थांबवताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल सैनिकांनी केलेल्या गोळीबारात चारही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. मात्र दाद धुक्याचा आधार घेत ट्रकचा चालक फरार झाला आहे.

पाकिस्तानच्या पुन्हा कुरापती

ट्रकमधून चार दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून सात एके रायफल, एक एम 4 रायफल, तीन पिस्तूल, 14 ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. पाकिस्तानातून घुसखोरी केल्यानंतर दहशतवादी ट्रकमधून काश्मीरच्या दिशेने जात होते, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनापूर्वी हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. 

बनावट नंबर प्लेटद्वारे काश्मीरमध्ये शिरण्याचा प्रयत्न

या कारवाईनंतर जम्मू काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बुधवारी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या सशस्त्र दहशतवाद्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकची नंबर प्लेट बनावट होती. ट्रकचे इंजिन आणि चेसीस नंबरमध्येही बदल करण्यात आले होते. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील सिध्रा तावी पुलाजवळील चेकपोस्टवर पेंढ्याने भरलेला ट्रक थांबवण्यात आला होता. तो ट्रक काश्मीरला जात होता, त्यावेळी कारवाईदरम्यान, चार दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 'ट्रकची नंबर प्लेट बनावट असल्याचे आढळून आले आहे. इंजिन आणि चेसीस नंबरमध्येही बदल करण्यात आला असून याबाबत तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जाणार आहे,' अशी माहिती मुकेश सिंह यांनी दिली आहे.