श्रीनगर : jammu and kashmir काश्मीरच्या दक्षिण भागात असणाऱ्या शोपियाँ Shopian भागात अनेक तासांपासून सुरु असणाऱ्या चकमकीमध्ये अखेर सुरक्षा दलांकडून पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. जम्मू आणि काश्मीर येथील पोलीस अधिक्षक विजय कुमार यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली.
बुधवारी सकाळच्या सुमारास शोपियाँमधील सुगू या खेड्यात सुरक्षा दलांच्या कारवाईस सुरुवात झाली. ज्यामध्ये सुरुवातीला तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ज्यानंतर त्यांच्याकडील शस्त्रसाठा लगेचच ताब्यात घेण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.
सुगू गावामध्ये दहशतवादी हालचाली पाहिल्या गेल्या असून, येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळताच, भारतीय सैन्यदल आणि जम्मू- काश्मीर पोलीस पथकानं तातडीनं या भागात कारवाई सुरु केली. येथे सुरक्षा दलांतील कर्मचारी पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.
आठवड्याभराच्या कालावधीत शोपियाँ भागात झालेली ही तिसरी मोठी कारवाई आहे. ज्यामध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा पाहता, आठवड्यापेक्षाही कमी कालावधीत या भागात १४ दहशतवादी ठार केल्याचं उघड होत आहे.