दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या भारतीय जवानाची हत्या

...

Updated: Jun 15, 2018, 08:17 AM IST
दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या भारतीय जवानाची हत्या title=

नवी दिल्ली : रमजान महिन्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आपलं नापाक कृत्य केलं आहे. दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या भारतीय जवानाची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथून गुरुवारी दहशतवाद्यांनी एका भारतीय जवानाचं अपहरण केलं होतं. औरंगजेब असे या जवानाचे नाव आहे. औरंगजेबचा मृतदेह पुलवामातील गूसो परिसरात आढळला.

औरंगजेब हा पुंछ जिल्ह्यातील निवासी होता. गुरुवारी दहशतवाद्यांनी औरंगजेबचं अपहरण केलं होतं. भारतीय जवानाचं अपहरण झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि भारतीय सैन्य दलाने शोध मोहिम सुरु केली.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य दलाचा जवान औरंगजेब हा ईद साजरी करण्यासाठी आपल्या घरी जात होता त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्याचं अपहरण केलं. दहशतवाद्यांनी पुलवामामधील कलमपोरा येथून औरंगजेबचं अपहरण केलं होतं. त्यानंतर त्याची हत्या केली.

जम्मू-काश्मीर पोलीस आणि सैन्य दलाच्या टीमला औरंगजेबचा मृतदेह कलमपोरा येथून १० किमी दूर पुलवामातील गुसू गावात आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानाच्या डोक्यात आणि मानेवर गोळी मारली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर लाईट इन्फेंटरीचा जवान औरंगजेब सध्या शोपियां येथील शादीमार्ग स्थित ४४ राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात होता. 

या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री उमर उब्दुल्ला यांनी ट्विट करत म्हटलं की, "आधीच दु:खाचा दिवस आणि त्यात आणखीन दु:खदायक घटना घडलीय. औरंगजेब याच्या आत्म्याला शांती मिळो".

दहशतवादी समीर टायगर याचा खात्मा करणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या टीममध्ये औरंगजेबचाही समावेश होता.

'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारींची हत्या

काश्मीरमध्ये ज्येष्ठ पत्रकाराची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. रायझिंग कश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात  आली  आहे. श्रीनगरच्या प्रेस कॉलनीत हा प्रकार घडलाय. या घटनेनंतर श्रीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.