जामिया विद्यापीठातील हिंसाचार गृह मंत्रालयाचं अपयश -सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांची मोदी सरकारवर टीका

Updated: Dec 17, 2019, 08:08 PM IST
जामिया विद्यापीठातील हिंसाचार गृह मंत्रालयाचं अपयश -सुप्रिया सुळे title=

नवी दिल्ली : दिल्लीतील जामिया विद्यापीठात झालेला हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं अपयश असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 'आपण प्रथमच देशात एवढा अत्याचार पाहिला असून देशाला आणि राज्याला शांततेची गरज आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकाराची आणि मारहाण करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 'एकीकडे देशासमोर अनेक प्रश्न उभे असताना त्याच्यावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं' देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

दुसरीकडे राज्यातल्या सध्याच्या विरोधकांनी मागील पाच वर्षात केलेल्या गोंधळाचं सत्य बाहेर येण्याची भीती असल्यानं ते अधिवेशनात गोंधळ घालत असल्याचा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

देशात सुरु असलेल्या हिंसात्मक आंदोलनामुळे 13 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते कपिल सिब्बल, गुलाम नबी आजाद, सपाचे नेते रामगोपाल यादव, कम्युनिस्ट नेते सीताराम येच्युरी आणि डी राजा हे नेते देखील उपस्थित होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपतींकडे नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. 

रविवारी दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी याला हिंसक वळण लागलं. या दरम्यान अनेक गांड्यांचं नुकसान करण्यात आलं. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करावा लागला. नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत मंजूर झाल्यानंतर ईशान्यातून दिल्लीतही आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्यानंतर देशभरात काही विद्यार्थी संघटनांनी याविरोधात आवाज उठला.