Jagannath Rath Yatra Ahmedabad Accident: अहमदाबाद येथे भगवान जगन्नाथ यात्रेदरम्यान एक मोठा अपघात झाला. दरियापूर येथील करियानाका रोडवर भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेमध्ये हा अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या 2 मजली इमारतींमधून अनेक भाविक ही यात्रा पाहण्यासाठी गर्दी करुन उभे होते. याचवेळी मोठ्या संख्येनं दर्शनासाठी भाविक उभे असलेली एक बाल्कनी कोसळली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
इमारतीची बाल्कनी तुटल्याने बाल्कनीत उभे असलेले अनेक लोक खाली पडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 22 लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी बचाव आणि मदतकार्य सुरु आहे. अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथाची 146 वी रथयात्रा काढण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सकाळी भगवान जगन्नाथाच्या आरतीला हजेरी लावली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या यात्रेसाठी विशेष प्रसाद पाठवला आहे.
#WATCH | Ahmedabad, Gujarat: Union Home Minister Amit Shah participates in Mangla Aarti at Jagannath Temple, before the Jagannath Rath Yatra 2023. pic.twitter.com/JgiQV0J2np
— ANI (@ANI) June 19, 2023
अहमदाबादमध्ये मागील अनेक दशकांपासून जगन्नाथाच्या रथयात्रेचं आयोजन केलं जातं. राज्यातील अनेक बडे नेते आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्यामुळेच अगदी केंद्रीय गृहमंत्र्यांपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वांनीच या यात्रेसाठी शुभेच्छा पाठवल्या. 146 व्या रथयात्रेमध्ये भगवान जगन्नाथबरोबर त्यांची बहीण सुभद्रा आणि भाई बलभद्र यांचे रथही या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. शहरामधून मार्गक्रमण करणाऱ्या या रथांना एक झलक पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. रस्त्याच्या दुर्तफा हजारोंच्या संख्येनं भाविक उभे असल्याचं पाहयला मिळतं. अनेकजण आपल्या घरांच्या खिडक्या आणि बाल्कन्यांमधूनच या यात्रेचं दर्शन घेतात. भाविक अशाच प्रकारे दर्शन घेत असताना आज हा दुर्देवी अपघात झाला.
VIDEO | Eight people were injured after the balcony of a two-storeyed building collapsed during the Lord Jagannath Rath Yatra in Dariyapur area of Ahmedabad. pic.twitter.com/7QEE2RZliK
— Press Trust of India (@PTI_News) June 20, 2023
अहमदाबादमधील ही रथयात्रा अनेक संवेदनशील भागांमधूनही मार्गक्रमण करते. त्यामुळे या रथयात्रेदरम्यान मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येतो. यंदा गुजरातमध्ये या रथयात्रेसाठी तब्बल 26 हजार जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी याहद्दल माहिती दिली होती. यंदा पहिल्यांदाच या यात्रेदरम्यान थ्री डी मॅपिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. म्हणजेच या गर्दीच्या हलचालीचं ऑनलाइन रेकॉर्डींग केलं जात आहे.