चांद्रयान २ : '१४ दिवसांत लॅंडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार'

 ९५ टक्के उद्दिष्ट साध्य झाल्याचा दावा इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी केलाय. 

Updated: Sep 8, 2019, 11:49 AM IST
चांद्रयान २ : '१४ दिवसांत लॅंडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार' title=

नवी दिल्ली : विक्रम लँडरशी संपर्क तुटला असता तरी पुढचे १४ दिवस लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल असं इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी शनिवारी सांगीतलं. तसंच चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरी ९५ टक्के उद्दिष्ट साध्य झाल्याचा दावा इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी केलाय. 

आर्बिटर अजूनही चंद्राच्या कक्षेत फिरत असून ते चंद्राचा स्थानशास्त्रीय नकाशा तयार करण्याचं काम करीत आहे. चांद्रयान-१ मोहिमेतील काही अपूर्ण उद्दिष्ट यात साध्य होणार आहेत. ऑर्बिटर हे चंद्राच्या १०० किलोमीटरच्या कक्षेत फिरत असून त्यामुळे दूरसंवेदन निरिक्षणं चालूच राहाणर आहेत. ऑर्बिटरचं प्रक्षेपण अचूक झाल्यानं त्याचा कार्यकाळही वाढल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलंय.

१३५ कोटी भारतीयांमध्ये पसरलेल्या शांततेला हा प्रयत्न नवी उमेद देईल. इस्त्रोचे सर्व वैज्ञानिक यासाठी झटत असून लॅंडरशी संपर्क तुटूनही आपल उद्दीष्ट पूर्ण होत असल्याचे सिवन म्हणाले. 

आज जे झालंय त्याच्या भविष्यावर परिणाम नसेल. चांद्रयान २ हे ९५ टक्के यशस्वी झाले आहे. चांद्रयानचा ऑर्बिटर ७.५ वर्षे काम करु शकतो. त्यामुळे गगनयान सहित इस्त्रोची अनेक मिशन पूर्ण होणार आहेत.