चांद्रयान २ : विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर इस्त्रो प्रमुखांची प्रतिक्रिया

वैज्ञानिकांवर गर्व असल्याचे इस्त्रोचे प्रमुख सिवन यांनी म्हटले. 

Updated: Sep 7, 2019, 08:00 AM IST
चांद्रयान २ : विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर इस्त्रो प्रमुखांची प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : भारताने चंद्राच्या दक्षिणी धुव्रावर चांद्रयान २ मोहीम अंतर्गत विक्रम लॅंडर पोहोचवून विक्रम रचला. लॅंडींग होण्याआधी वैज्ञानिकांचा लॅंडरशी असलेला संपर्क तुटला. असे असले तरी आतापर्यंतच्या या मोहीमेबद्दल इस्त्रोचा साऱ्या देशाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच आम्हाला आमच्या वैज्ञानिकांवर गर्व असल्याचे इस्त्रोचे प्रमुख सिवन यांनी म्हटले. 

विक्रम लॅंडर क्रॅश झाले का ? अशी शंका यावेळी इस्रोचे वैज्ञानिक देवीप्रसाद कर्णिक यांना विचारण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना आमच्या वैज्ञानिकांची टीम मिळालेल्या माहीतीवरून अधिक तपास करत असल्याचे ते म्हणाले. या मोहीमेबाबत अधिक माहीती मिळण्यास थोडा वेळ लागेल. आमचे वैज्ञानिक आमच्यासाठी प्रेरणा असल्याचेही ते म्हणाले.

चंद्राच्या पृष्ठभापासून 35 किलोमीटर उंचीवर असतांना रात्री एक वाजून 37 मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर स्वयंचलित पद्धतीने उतरायला सुरुवात केली. उतरण्याच्या सुरुवातीला एक हजार 640 मीटर प्रति सेकंद असा विक्रम लँडरचा वेग होता. टप्प्याटप्प्याने हा वेग कमी करत विक्रम लँडर चंद्राच्या जमिनीच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. 

साधारण एक वाजून 52 मिनीटांनी विक्रम लँडर चंद्रावर अलगद उतरणे नियोजित होते. जो मार्ग आणि दिशा ठरवून देण्यात आली होती त्या मार्गानेच विक्रम लँडरची वाटचाल सुरुही होती. 

मात्र चंद्राच्या जमिनीपासून 2 किलोमीटर 100 मीटर उंचीवर असतांना बंगळुरु इथल्या नियंत्रण कक्षाशी विक्रम लँडरचा असलेला संपर्क हा तुटला. तेव्हाच गेले काही मिनिटे उल्हासित असलेल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झाले आणि या मोहिमेत काहीतरी गडबड झाली असल्याचं स्पष्ट झालं.

काही प्रयत्न केल्यानंतरही विक्रम लँडरशी संपर्क होत नसल्याचं स्पष्ट झाल्यावर इस्त्रोचे अध्यक्ष डॉ के सीवन यांनी नियंत्रण कक्षातील जागा सोडली आणि पंतप्रधान यांना या मोहिमेत काही गडबड झाल्याची माहिती दिली. ही माहिती देतांना इस्त्रोचे अध्यक्ष भावूक झाले होते. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या इस्त्रोच्या माजी अध्यक्षांनी सीवन यांना धीर देत आत्तापर्यंतच्या चांद्रयान 2 मोहिमेच्या वाटचालीबद्दल कौतुक केले. मग सीवन यांनी मोहिमेत काही गडबड झाल्याचं उपस्थितांसह देशासमोर स्पष्ट केलं.
मग पंतप्रधानांनी मोदी यांनी नियंत्रण कक्षात असलेल्या शास्त्रज्ञांसमोर जात त्यांना धीर दिला. शास्त्रज्ञांचा देशाला अभिमान असल्याचं सांगितलं.

विक्रम लँडर जरी चंद्रावर अलगद उतरण्यात अपयशी ठरला असला तरी चंद्राभोवती फिरणारे ऑर्बिटर अजुनही व्यवस्थित काम करत आहे. ऑर्बिटर आणि विक्रम लँडरच्या उपलब्ध माहितीच्या आधारे लवकरच अधिकची माहिती समोर येईल. तेव्हा चांद्रयान -2 मोहिमेतील एक टप्पा अयशस्वी ठरला असला तरी ऑर्बिटरमुळे चांद्रयान - 2 मोहीम ही पुढील किमान एक वर्ष सुरुच रहाणार आहे. या मोहिमेत आतापर्यंत केलेल्या वाटचालीबद्दल इस्त्रोचा देशाला अभिमान आहे.