VIDEO : याच भारताचं स्वप्नं आपण पाहिलं होतं का?- नसीरुद्दीन शाह

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्यांनो...

Updated: Jan 4, 2019, 07:33 PM IST
VIDEO : याच भारताचं स्वप्नं आपण पाहिलं होतं का?- नसीरुद्दीन शाह title=

मुंबई : आपल्या मुलांप्रती काळजी व्यक्त करत भारतात राहण्य़ास भीती वाटते, असं म्हणणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांची मतं मांडली आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कशा प्रकारे देशात दुय्यम दर्जा दिला जात असून संविधानाने दिलेल्या या मुलभूत अधिकाराची कशा प्रकारे पायमल्ली केली जात आहे, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला आहे. 

कलाकार, अभिनेते आणि पत्रकारांचा आवाज कशा प्रकारे दाबला जात आहे, याविषयीसुद्धा त्यांनी खंत व्यक्त केली. अवघ्या दोन- अडीच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये शाह भारतीय संविधानाकडे सर्वांचच लक्ष वेधत असून, त्यात कशा प्रकारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळण्याचा हक्क प्रत्येकालाच देण्यात आला आहे, ही बाब अधोरेखित करताना दिसत आहेत. 

'प्रत्येकाच्याच प्राणांना आणि त्यांच्या संपत्तीला संरक्षण असलं पाहिजे. आपल्या देशात गरिबांचं रक्षम करणारे, गरजूंना मदत करणारे, कायद्याच्या, संविधानाच्या मार्गावर चालणारे मंडळी एक प्रकारे याच संविधानाचं संरक्षण करत असतात', असं म्हणत, स्वत:च्या हक्कांसाठी लढणाऱ्यांनाच कारागृहाचा रस्ता दाखवण्यात येत असल्याची विदारक परिस्थिती त्यांनी सर्वांसमोर ठेवली.

'धर्माच्या नावाखाली उभ्या होणाऱ्या वैराच्या भिंती, निष्पापांचा बळी आणि साऱ्या देशावर तिरस्कार आणि दहशतीचं वातावरण पसरवण्यत येत आहे, खरं बोलणाऱ्यांच्या साऱ्या वाटाच बंद केल्या जात आहेत', ही चिंता मांडत याच देशाचं स्वप्न आपण पाहिलं होतं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सध्याच्या घडीला देशात श्रीमंतांचाच आवाज ऐकला जात असून, गरीब आणि कमकुवत वर्गाला नेहमीच पायदळी तुडवलं जात आहे. जिथे एकता होती, तिथेच आज अंधकार आहे याकडेही त्यांनी सर्वांचच लक्ष वेधलं आहे.