पत्नीचं कॅन्सरमुळे निधन झाल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याने रुग्णालयातील आयसीयूमध्येच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. आसाम सरकारमध्ये गृह आणि राजकीय विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यांची पत्नी कर्करोगाने ग्रस्त होती.
आसामचे पोलीस महासंचालक जी पी सिंग यांनी आयपीएस अधिकाऱ्याच्या मृत्यूची माहिती दिली. पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटांत त्यांनी आत्महत्या केली असं त्यांनी सांगितलं आहे. शिलादित्य चेतिया यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण पोलीस खात्यावर शोककळा पसरली असल्याचं जी पी सिंग यांनी सांगितलं आहे.
"दुर्दैवी घटनेत 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी आज संध्याकाळी स्वतःचा जीव घेतला. डॉक्टरांनी मागील अनेक काळापासून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं जाहीर केल्यानंतर काही वेळात त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. संपूर्ण आसाम पोलीस कुटुंब शोकात आहे,” असं आसाम पोलीस प्रमुख म्हणाले आहेत.
हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर हितेश बरुआ यांनी इंडियन एक्स्पेसशी संवाद साधताना सांगितलं आहे की, "ती सुमारे दोन वर्षांपासून लढत होती आणि तिच्यावर इतरत्र उपचारही झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून, तिच्यावर येथे उपचार सुरू होते. त्याने हॉस्पिटलमध्ये एक वेगळी खोली घेतली होती. अखेरच्या तीन दिवसांत आम्ही त्यांना प्रकृती खालावली असल्याचं कळवलं होतं. दुपारी 4.30 वाजता उपस्थित डॉक्टरांनी त्यांना तिच्या निधनाची माहिती दिली. डॉक्टर आणि एक नर्स त्याच्यासोबत खोलीत होते. प्रार्थना करायची आहे असं सांगून त्यांनी त्यांना बाहेर पडण्याची विनंती केली. सुमारे 10 मिनिटांनंतर खोलीतून मोठा आवाज ऐकू आला”.
2009 चे भारतीय पोलीस सेवा अधिकारी शिलादित्य चेतिया गेल्या चार महिन्यांपासून रजेवर होते. कदादित पत्नीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा ते सामना करत होते. त्यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
आसाम सरकारमध्ये सचिव होण्यापूर्वी शिलादित्य चेतिया यांनी राज्याच्या तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून काम केलं होतं. दरम्यान त्यांनी कोणत्या स्थितीत आत्महत्या केली यासंबंधी पोलीस तपास करत आहेत.