Kerala Matrimony: लग्नसंस्था ही संकल्पना हल्ली बदलत चालली आहे. काळानुसार यातही बदल होत चालले आहेत. पूर्वी नातेवाईकांच्या मदतीने लग्न जुळवण्यात येत होती. मात्र आता यातही बदल होत आहेत. प्रेमविवाहामुळं मुलं त्यांच्या पसंतीच्या जोडीदारासोबत लग्न करतात. त्याचबरोबर आता लग्न जुळवण्यासाठीही विवाह मंडळ व मॅट्रिमोनिअल साइट याचा आधार घेतला जातो. अनेक मॅट्रिमोनिअर साइट्सवर 100 टक्के लग्न जुळवण्याची हमी दिली जाते. एका तरुणाला मात्र मॅट्रिमोनिअल साइटवर वधु भेटलीच नाही. त्या रागात त्याने थेट साइटवरच तक्रार दाखल केली आहे. तसंच, कोर्टात केसदेखील दाखल केली आहे.
केरळ येथील एर्नाकुलम जिल्ह्यातील एका तरुणाला लग्नासाठी वधु मिळाली नाही तर त्यांने मॅट्रिमोनी साइटवरच केस दाखल केली. या तरुणाने आता ही केस जिंकली आहे. नुकसानभरपाई म्हणून या तरुणाला 25 हजार रुपयांची रक्कम मिळाली आहे. DCCRC ने हा निर्णय सुनावला आहे. त्याचबरोबर ती साइट तरुणाला कायदेशीर खर्चाची रक्कमदेखील देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मॅट्रिमोनी साइट त्याच्यासाठी वधु शोधून देण्याचे वचन पूर्ण करु शकले नाही, असा दावा तरुणाने केला होता.
जिल्हा फोरमचे अध्यक्ष डीबी बीनू आणि अन्य सदस्य रामचंद्र वी आणि श्रीविद्या टीएन यांनी हा निर्णय सुनावत 15 मे रोजी आदेश पारित केला होता. केरळच्या मॅट्रिमोनी सेवा देण्यास अकार्यक्षम ठरली, असा ठपका त्यांनी ठेवला आहे. बार अँड बँचने दिलेल्या माहितीनुसार, फोरमने म्हटलं आहे की, तक्रारदार मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या अनेक पीडितांपैकी एक होता. सोशल मीडियावरुन जनतेच्या प्रतिक्रियादेखील तक्रारकर्त्यांने गोळा केल्या होत्या जेणेकरुन त्याची केस अधिक मजबूत होईल.
फोरमने म्हटलं आहे की, मॅट्रिमोनिअल साइटने जीवनसाथी शोधणाऱ्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक गोष्टी सांगितल्या होत्या. मात्र, त्यांना आवश्यक असलेल्या सेवा दिल्याच नाहीत. तक्रारदाराने हे सिद्ध करण्यासाठी अनेक पुरावे दिले. तक्रारदाराने त्याच्यासोबत घडलेला प्रकारावर जनतेची प्रतिक्रिया पाहण्यासाठी सोशल मीडियाची मदत देखील घेतली होती. तेव्हा तक्रारदाराचा दावा खरा असल्याचा निष्कर्ष समोर येत होता.
2019 मध्ये चेरथलाचे मुळ रहिवाशी असलेल्या युवकाने ही याचिका दाखल केली होती. फोरमने म्हटलं आहे की, 2018मध्ये केरलच्या मॅट्रिमोनी साइटवर तरुणाने त्याचा बायोडाटा दाखल केला होता. नंतर केरळ मॅट्रिमोनीच्या प्रतिनिधींनी त्याच्या घरी आणि कार्यालयात संपर्क साधला. लग्नासाठी मुलगी शोधण्याच्या बदल्यात त्याला तीन महिन्यांची मेंबरशिप ४१०० रुपये देण्यास सांगण्यात आले होते.