पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

चार दिवसांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांच्या जामीनाचा अर्ज फेटाळून लावला होता.

Updated: Oct 3, 2019, 07:27 PM IST
पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ title=

नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणात अटकेत असलेले काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे चिदंबरम यांना आणखी काही दिवस तिहार तुरुंगातच राहावे लागणार आहे. 

चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यामुळे गुरुवारी त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सीबीआयने त्यांच्या न्यायालयीन कोठडीला मुदतवाढ देण्याची मागणी केली. 

दरम्यान, या सुनावणीवेळी पी.चिदंबरम यांनी आपल्याला घरचे जेवण मिळावे, अशी विनंती केली. याशिवाय, त्यांना काही औषधांचीही मागणी केली. न्यायालयाने त्यांची ही विनंती मान्य केली असून त्यांना दिवसातून एकदा घरगुती जेवण मिळणार आहे. 

यापूर्वी न्यायालयाने चिदंबरम यांची ही विनंती अनेकदा फेटाळून लावली होती. चिदंबरम हे ७४ वर्षांचे आहेत. ही बाब ध्यानात घेऊन त्यांना घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला होता. मात्र, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्याला विरोध केला होता. चौटाला हेदेखील राजकीय आणि वृद्ध कैदी आहेत. त्यांनाही तुरुंगातीलच जेवण दिले जाते. प्रशासन कोणताही भेदभाव करू शकत नाही, असे तुषार मेहता यांनी सांगितले होते.

चार दिवसांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांच्या जामीनाचा अर्ज फेटाळून लावला होता. चिदंबरम तुरुंगाबाहेर आल्यास साक्षीदारांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दबाव येऊ शकतो, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. 

२१ ऑगस्ट रोजी पी. चिदंबरम यांना अटक केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या काळात पी. चिदंबरम यांनी जामीनासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाकडून वेळोवेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीला मुदतवाढ दिली जात आहे.