रांची: योगसाधना तुमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जागतिक योगदिनानिमित्त रांची येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी योगसाधनेचे महत्त्व समजवून सांगताना म्हटले की, गेल्या हजारो वर्षांपासून योग पद्धतीत कोणताही फरक पडलेला नाही. निरोगी शरीर, मन आणि एकतेची भावना याचा योग्य मिलाफ योगक्रियेत आहे. त्यामुळे योग साधनेने माणूस समृद्ध होतो. यामुळे माणसाच्या आयुष्यातील अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
रांची येथील प्रभात तारा मैदानात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला ४० हजार लोक उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सर्वांबरोबर योग साधनाही केली. भारतासह संपूर्ण जगभरात आज पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबा यांच्या साथीने योगाभ्यास केला.
दरम्यान रांची येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, योग हा सर्वांचा आहे आणि सर्वजण योगाचे आहेत. हवामान बदल हे यंदाच्या योग दिनाचे मुख्य सूत्र राहील. लोकांनी केवळ आजारांवरच लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्याचे निराकरण कसे करता येईल, याकडे लक्ष द्यावे. निरोगी आरोग्यासाठी केवळ औषधे व शस्त्रक्रिया पुरेशा नाहीत. त्यामुळे आमचे सरकार योगाभ्यासाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य कसे सुधारता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.
#WATCH Jharkhand: PM Modi performs yoga at Prabhat Tara ground in Ranchi on the occasion of #InternationalDayofYoga. https://t.co/uIIvg30dZ0
— ANI (@ANI) June 21, 2019
योग हा वय, रंग, जात, पंथ, प्रांत, गरीब-श्रीमंत या सर्व भेदांपलीकडे जाणारा आहे. त्यामुळे लोकांनी योगाभ्यासाबद्दल सतत जागरूक राहून माहिती घेत राहिली पाहिजे, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.