आयएनएस खांदेरी : ही 'सायलन्ट किलर' वाढवणार नौदलाची शान

आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईत 'वेस्टर्न नेव्हल कमांड'मध्ये या पाणबुडीचं लोकार्पण करणार आहेत

शुभांगी पालवे | Updated: Sep 28, 2019, 07:45 AM IST
आयएनएस खांदेरी : ही 'सायलन्ट किलर' वाढवणार नौदलाची शान  title=

मुंबई : समुद्र सुरक्षेसाठी भारताच्या नौदलाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने स्वदेशी निर्मिती असलेली 'आयएनएस खांदेरी' (INS Khanderi) आज भारतीय नौदल ताफ्यात सामील होतेय. आज (२८ सप्टेंबर रोजी) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईत 'वेस्टर्न नेव्हल कमांड'मध्ये ( western naval command) या पाणबुडीचं लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर 'आयएनएस विक्रमादित्य'वर स्वार होत संपूर्ण दिवस संरक्षण मंत्री समुद्राच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत. आयएनएस खांदेरीशिवाय २८ सप्टेंबर रोजी मुंबईतच नौदलासाठी 'पी - १७ ए' क्लासची आणखी एक नौकेचं अनावरण केलं जाणार आहे. तसंच संरक्षण मंत्री यावेळी एका 'एअरक्राफ्ट कॅरिअर ड्राय डॉक'चंही उद्घाटन करणार आहेत. यामुळे मोठ्या युद्धनौकेचं दुरुस्ती किंवा नुतनीकरणाची सुविधा उपलब्ध होईल.

नौदलासाठी हा क्षण नक्कीच खास असणार आहे. कारण 'फ्रेंच कंपनी नेव्हल ग्रुप' (DCNS) द्वारे आखणी करण्यात आलेल्या 'आयएनएस खांदेरी' या पानबुडीच्या वेगवेगळ्या भागांची निर्मिती भारतातच वेगवेगळ्या ठिकाणी करून मुंबईत या पाणबुडीची जोडणी 'माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड' (MDL) द्वारे करण्यात आलीय. बांधणी पूर्ण झाल्यानंतर १९ सप्टेंबर रोजी 'आयएनएस खांदेरी' नौदलाकडे सोपवण्यात आलीय. २८ सप्टेंबरनंतर ती खऱ्या अर्थानं वापरात येणार आहे. 

शत्रुला हुडकून काढणार
आयएनएस खांदेरी

'स्कॉर्पेन क्लास'ची दुसरी पाणबुडी

उल्लेखनीय म्हणजे म्हणजे भारतीय नौदलाच्या सर्व युद्धनौका आणि पानबुड्या यांचा उल्लेख 'SHE' अर्थात 'ती' असा स्त्रीलिंगी केला जातो. आयएनएस खांदेरी ही दुसरी स्कॉर्पेन क्लासची  (Scorpene Class) पानबुडी (submarine) आहे. या प्रोजेक्टमधली पहिली पाणबुडी 'आयएनएस कलवरी' गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नौदलात सामील झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आयएनएस कलवरी'चं अनावरण केलं होतं. ही पाणबुडी 'मेक इन इंडिया'चा उत्तम नमुना असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी व्यक्त केली होती. याच धर्तीवर 'आयएनएस खांदेरी'नंतर 'आयएनएस करंज' ही तिसरी पाणबुडीदेखील लवकरच नौदलात सामील होईल. याशिवाय आणखीन तीन पाणबुड्यांची निर्मिती सुरू आहे. २००५ साली भारतानं 'फ्रेंच कंपनी नेव्हल ग्रुप'सोबत सहा पानबुड्यांसाठी करार केला आहे. यासाठी जवळपास २५,००० करोड रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

आयएनएस खंडेरी : ही 'सायलन्ट किलर' वाढवणार नौदलाची शान
आयएनएस खांदेरी

'आयएनएस खांदेरी'ची वैशिष्ट्य

'आयएनएस खांदेरी'ची ओळख तीन मुख्य भागांत करून घेता येईल. सर्वात पहिला भाग म्हणजे या पाणबुडीची बॅटरी असलेला भाग... पाणबुडीला पाण्याखालील हालचालीसाठी ऊर्जा देण्याचं कार्य याच भागातून होतं. सध्याचं उन्नत तंत्रज्ञान या पाणबुडीत वापरण्यात आलंय.

प्रत्येकी ७५० किलो वजनाच्या तब्बल ३६० बॅटरी आणि दोन १२५० केडब्ल्यू डिझेल इंजिन या पाणबुडीत आहेत. त्यामुळे सलग ४५ दिवस ही पानबुडी कोणत्याही अडथळ्याविना आपला प्रवास सुरू ठेऊ शकते. जवळपास ६५०० नॉटिकल माइल्स (जवळपास १२,००० किलोमीटर अंतर) ही पाणबुडी पार करू शकते. एका वेळी या पाणबुडीत ४० जणांचा क्रू काम करू शकतो. 

एका डाइव्हमध्ये तब्बल अडीच दिवस ही पाणबुडी पाण्याच्या खाली राहू शकते. तसंच जवळपास ३५० मीटर खोल पाण्यात जाऊन शत्रूचा थांगपत्ता लावण्यासाठी ही पाणबुडी सक्षम आहे. २२ नोटस् असा या पाणबुडीचा टॉप स्पीड आहे. या पाणबुडीत दोन पेरिस्कोप देण्यात आलेत. मागच्या भागात लावण्यात आलेल्या magnetised propulsion मोटरमुळे या पाणबुडीचा आवाज बाहेर जाण्यापासून रोखला जातो. त्यामुळे आपला थांगपत्ता न लागू शत्रूवर हल्ला करण्यासाठी या पाणबुडीचा वापर केला जाऊ शकतो. या सक्षमतेमुळेच या पाणबुडीचा उल्लेख 'सायलन्ट किलर' असाही केला जातो. 

आयएनएस खांदेरीवर लावण्यात आलेल्या ६ टॉरपीडो ट्युब्स फायरिंग करण्यासाठी सक्षम आहेत. तसंच माइन्स (सुरुंग) पसरवण्यासाठीही या पाणबुडीचा वापर केला जाऊ शकतो.