भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी बॅट कमांडोंच्या घुसखोरीचा व्हीडिओ प्रसिद्ध

पाकिस्तानकडून आतापर्यंत १५ वेळा घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. 

Updated: Sep 18, 2019, 10:44 AM IST
भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी बॅट कमांडोंच्या घुसखोरीचा व्हीडिओ प्रसिद्ध title=

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून वारंवार सीमारेषेवर घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याकडून एक व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानचे बॅट कमांडो आणि दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याचे दिसत आहे. 

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार हा व्हीडिओ १२ आणि १३ सप्टेंबरचा आहे. नाईट व्हिजन कॅमेऱ्याने टिपलेल्या या व्हीडिओत पाकिस्तानचे कमांडो हाजीपूर सेक्टरमध्ये लपूनछपून शिरताना दिसून आले. ही घुसखोरी लक्षात आल्यानंतर भारतीय सैन्याने तातडीने हालचाल करत ग्रेनेडसचा मारा केला. यामध्ये पाकिस्तानचे सैनिक ठार झाले. यानंतर पाकिस्तानी सैन्याला पांढरे निशाण फडकावून आपल्या सैनिकांचे मृतदेह परत न्यावे लागले होते. 

पाकिस्तानकडून यापूर्वी दहशतवाद्यांच्या मदतीने अशाप्रकारीच घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, दरवेळी पाकिस्ताने हा दावा फेटाळून लावला. परंतु, भारतीय लष्कराच्या माहितीनुसार पाकिस्तानकडून आतापर्यंत १५ वेळा घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. 

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने सुमारे ६० दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी वापरात नसलेल्या निद्रिस्त मार्गांचा वापर केला असल्याची माहितीही पुढे आली आहे. दहशतवादी हे गुरेझ, माचिल आणि गुलमर्ग या उंच प्रदेशातील निद्रिस्त मार्गांवरून घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले होते. हे मार्ग यापूर्वी, १९९० च्या दशकामध्ये मध्य काश्मीरात घुसखोरी करण्यासाठी वापरण्यात येत होते.

काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबागसिंग यांनीही नियंत्रण रेषेजवळून मोठ्याप्रमाणावर घुसखोरी होत असल्याची माहिती दिली होती. यापैकी बहुतांश प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले. मात्र, काही दहशतवादी निद्रिस्त मार्गाचा वापर करून काश्मीरमध्ये शिरल्याचा अंदाज आहे.