'विमानातून प्रवाशांना फसवून खाली उतरवले', IndiGo वर गंभीर आरोप

Indigo Airlines: बंगळुरू विमानतळावर आपली फसवणूक झाल्याचे या प्रवाशांचे म्हणणे आहे. हे प्रवासी बेंगळुरु विमानतळावरुन चेन्नईला जात होते.

Updated: Nov 21, 2023, 11:35 AM IST
'विमानातून प्रवाशांना फसवून खाली उतरवले', IndiGo वर गंभीर आरोप title=

Indigo Airlines: विमान प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. अनेकदा मोठमोठ्या एअरलाइन्स जास्त तिकिट आकारुनही चांगल्या सुविधा देत नाहीत, अशी तक्रार प्रवासी करत असतात. अशा घटनांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. दरम्यान, इंडिगो एअरलाइन्ससंदर्भात एक महत्वाची घटना समोर येत आहे. इंडिगो एअरलाइन्सवर जबरदस्तीने उतरवल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे.
 
बेंगळुरूमधील काही प्रवाशांनी यासंदर्भात तक्रार केली आहे.  बंगळुरू विमानतळावर आपली फसवणूक झाल्याचे या प्रवाशांचे म्हणणे आहे. हे प्रवासी बेंगळुरु विमानतळावरुन चेन्नईला जात होते. त्यावेळी इंडिगोच्या विमानातून सहा प्रवासी प्रवास करत होते. पण फ्लाइट क्रू मेंबर्सनी आम्हाला जबरदस्तीने खाली उतरवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर रात्री राहण्यासाठी आमची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. विश्वासघात करून आम्हाला खाली उतरविण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले. 

बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी रात्री 9 च्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. इंडिगोचे 6E478 हे विमान बंगळुरूहून चेन्नईला जात होते. या फ्लाईटमध्ये फक्त 6 लोक प्रवास करत होते असे सांगितले जात आहे. दरम्यान इंडिगोमधील क्रू मेंबर्सचा एका प्रवाशाला फोन आला. तुम्हाला दुसऱ्या फ्लाइटने चेन्नईला पाठवले जाईल, असे त्याला फोनवर सांगण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले. पुढील फ्लाइटसाठी तुम्ही तुमच्या बोर्डिंग पाससह विमानतळात वाट पाहण्यास सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

'6 प्रवाशांमुळे इंडिगोचे उड्डाण रद्द'

असेच कॉल अन्य पाच प्रवाशांना आल्याचा आरोप आहे. क्रू मेंबरच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सर्व प्रवासी फ्लाइटमधून खाली उतरले. आम्ही विमानतळाच्या आत बराच वेळ थांबलो पण आम्हाला इतर कोणत्याही फ्लाइटसाठी बोर्डिंग पास देण्यात आला नाही. सहा प्रवाशांसह उड्डाण करावे लागू नये म्हणून इंडिगोने आम्हाला फसवून फ्लाइट उतरवायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्हाला ती रात्र बेंगळुरूमध्येच घालवावी लागली, असे प्रवाशाने सांगितले. 

विमानतळावरील एका कर्मचाऱ्याने या घटनेला दुजोरा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. विमानतळापासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये दोन प्रवाशांची राहण्याची सोय करण्यात आली होती. तर चार जण विमानतळाच्या लाउंजमध्ये थांबले होते, असे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी त्यांना चेन्नईला विमानाने पाठवण्यात आले. या गैरसोयीमुळे इंडिगोच्या कर्मचाऱ्यांवर खोटे बोलणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. दरम्यान इंडिगोकडून यासंदर्भात काय स्पष्टीकरण येणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.