Vande Bharat Metro Train: वंदे भारतनंतर रेल्वेने आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. आता लवकरच वंदे भारत मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पहिल्या वंदे भारत मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. 16 सप्टेंबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद ते भूज या मार्गावर पहिली वंदे भारत मेट्रो धावणार आहे. ही ट्रेन जवळपास मुंबई व दिल्ली येथे धावणाऱ्या मेट्रोसारखीच आहे. मात्र मेट्रो फक्त शहरात मर्यादित अंतरापर्यंतच चालवण्यात येते. मात्र, वंदे भारत मेट्रो लांबचा पल्ला ही गाठणार आहे. फक्त 5 तास 45 मिनिटांत ही मेट्रो 334 किमीचे अंतर पार करणार आहे. पण या ट्रेनचे वैशिष्ट्य काय हे जाणून घेऊया. तसंच, कोणत्या मार्गावर ही मेट्रो धावणार तर तिकिट किती असणार हेदेखील जाणून घेऊया.
भुज ते अहमदाहाद पहिली वंदे भारत मेट्रो अंजार, गांधीधाम,भचाऊ, समखियाली,हलवद, धांगध्रा, विरमगाव, चांदलोडिया आणि साबरमती या स्थानकांवर थांबेल. तर, वंदे भारत मेट्रो सकाळी 5.50 वाजता भुजवरुन रवाना होईल आणि त्याच दिवशी अहमदाबादला पोहोचेल.त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता अहमदाबादहून रवाना होईल व रात्री 11.10 वाजता भुजला पोहोचणार आहे. प्रवाशांना या ट्रेनची सेवा आठवड्यातून सहा दिवस मिळणार आहे. तर, प्रत्येक स्थानकांवर ही ट्रेन 2 मिनिटे थांबणार आहे.
वंदे भारत मेट्रो एक सेमी हायस्पीड ट्रेन असून 100 ते 250 किमी प्रतितासच्या वेगात धावते. ट्रेनच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास मेट्रो ट्रेनमध्ये 3*3 बेंच टाइप सीट असणार आहेत. यामुळं प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर, दिव्यांगासाठी ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रो कोचमध्ये व्हिलचेअर-शैचालयदेखील उपलब्ध आहेत. सुररक्षेसाठी वंदे मेट्रोच्या कोचमध्ये टॉक बॅक सिस्टम लावण्यात आली आहे. त्याच्या मदतीने कोणताही प्रवासी आपत्तकालीन परिस्थितीत ट्रेनच्या ड्रायव्हरसोबत बोलू शकतो. वंदे भारत मेट्रो ट्रेनमध्ये सध्या 12 कोच आहेत. मात्र नंतर वंदे भारत मेट्रोच्या कोचची संख्या 16 करण्यात येणार आहे.
पहिल्या वंदे भारत मेट्रोचे तिकिट दर कमीत कमी 30 रुपये असेल. 50 किलोमीटरच्या प्रवासासाठी 60 रुपये असणार आहे. तसंच, वंदे भारत मेट्रो ट्रेनचा मासिक पास वैध असेल. साधारण मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनसाठीचे तिकिट चालणार नाही.यासाठी एसएसटी तिकिट जारी केले जाते. प्रवासी ही ट्रेन सुटण्याच्या आधी काउंटरवर तिकिट खरेदी करु शकतात.