भारताला किंचित दिलासा; गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ८० हजाराखाली

आतापर्यंत देशातील एकूण ८८,९३५ लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 

Updated: Sep 22, 2020, 10:39 AM IST
भारताला किंचित दिलासा; गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ८० हजाराखाली title=

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे ९० हजाराहून अधिक रुग्ण सापडणाऱ्या भारताला मंगळवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. बऱ्याच दिवसानंतर नव्या कोरोना रुग्णांची संख्या ८० हजाराहून खाली गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ७५०८३ रुग्ण मिळाले आहेत. तर १०५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५५,६२, ६६४ इतका झाला आहे. यापैकी ९,७५,८६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ४४,९७,८६८ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशातील एकूण ८८,९३५ लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 

मोठी बातमी! जगभरात कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत अग्रेसर

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारे राज्य आहे. राज्यात सोमवारी कोरोनाच्या २०,५९८ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४५५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनाचा मृत्यूदर हा २.७ टक्के झाला आहे. तर राज्यात रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ७३.१७ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात ८,८४,३४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

धास्ती! राज्यातील 'या' भागात अवघ्या २० दिवसांत एक हजार कोरोनाबळी

गेल्या काही दिवसांत देशात दररोज ९० हजाराहून नव्या रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र, समाधानाची बाब हीच की, भारतात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. भारताने नुकतेच रिकव्हरी रेटमध्ये अमेरिकेलाही मागे टाकले होते. भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षाही अधिक झाला आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी रेटमध्ये भारत अव्वल स्थानी आला आहे.