नवी दिल्ली: गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ४९,९३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७०८ जणांचा मृत्यू झाली आहे. एकाच दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. यासोबतच भारतातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने १४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे आता भारतातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे. सध्याच्या घडीला देशात ४,८५,११४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ९,१७, ५६८ लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, देशात कोरोनामुळे झालेले ३२,७७१ मृत्यू ही चिंता वाढवणारी बाब आहे.
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारे राज्य आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ९,४३१ नवे रुग्ण मिळाले. तर तर २६७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ३,७५,७९९ इतका झाला आहे.
The total number of #COVID19 samples tested up to 26th July is 1,68,06,803 including 5,15,472 samples tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/1W0UMxSAhc
— ANI (@ANI) July 27, 2020
दरम्यान, शुक्रवारनंतर गेल्या दोन दिवसांत देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाने पुन्हा उसळी घेतल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु, अनेक राज्यांमध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढत असल्याने रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. तरीही एवढ्या वेगाने रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने सामान्य लोक चिंतेत पडले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू आणि दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.