फिरस्तीवर निघणाऱ्यांना सरकारकडून मिळणार अनोखं बक्षीस

आता फिरण्यासाठी गरज फक्त.... 

Updated: Jan 29, 2020, 09:17 AM IST
फिरस्तीवर निघणाऱ्यांना सरकारकडून मिळणार अनोखं बक्षीस   title=
छाया सौजन्य- फेसबुक

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाविषयी भारतीय नागरिकांमध्ये बरीच जागरुकता पाहायला मिळत आहे. नवनवीन ठिकाणांच्या वाटांवर निघणं असो किंवा मग काही दुर्गम भागांमध्ये असणाऱ्या ठिकाणांचं जतन करणं असो. मोठ्या संख्येने पर्यटक पुढाकार घेताना दिसतात. अमुक कालावधीत, ठरलेल्या तासांमधील नोकरी करुनही आपला भटकंतीचा छंद जोपासत नव्या जोमाने पुन्हा कामाला लागण्याचं हे त्यांचं एक तंत्रच आहे. अशाच हौशी पर्यटकांसाठी भारत सरकारकडून एक नवा उपक्रम राबवण्यात आला आहे. ज्याची सर्वत्र चर्चाही सुरु आहे. 

एका वर्षात देशातील जवळपास १५ ठिकाणांना भेट देणाऱ्यांना सरकारकडून एक खास आणि तितकीच आकर्षक भेट दिली जाणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार बक्षीस स्वरुपात शासनाकडून या पर्यटकांच्या फिरण्याचा खर्च उचलण्यात येणार आहे. 

ओडिशा सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पर्यटन परिषदेच्या सांगता सोहळ्यात त्यांनी ही माहिती दिली. देखो अपना देश या अनोख्या उपक्रमाअंतर्गत ही बाब समोर आली आहे. ज्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावरही देण्यात आल़्याचं सांगण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत पर्यटक २०२२ पर्यंत भारतातीलच १५ विविध ठिकाणांना भेट देण्याची प्रतिज्ञा घेऊ शकतील. ज्या आधारे पर्यटन मंत्रालयाकडून (निर्धारित काळासाठी) या पर्यटकांच्या १५ ठिकाणांवर फिरण्याच्या खर्चाची जबाबदारी घेण्यात येईल. या उपक्रमाअंतर्गत मिळणाऱ्या अनोख्या बक्षीसासाठी तुम्हाला संकेतस्थळावर त्या ठिकाणांची छायाचित्र अपलोड करणं गरजेचं असेल. 


छाया सौजन्य- फेसबुक 

उपक्रमासाठी काही अटीही असतील. ज्यापैकी एक म्हणजे स्वत:च्या राज्यातून बाहेर पडत तुम्हाला नवी अशी १५ ठिकाणं फिरायची आहेत. या उपक्रमाअंतर्गत ज्या पर्यटकांचा खर्च मंत्रालयाकडून केला जाईल, अर्थात ज्यांना हे धमाल बक्षीस मिळेल त्यांना भारतीय पर्यटनासाठीचं सदिच्छादूत म्हणून घोषित करण्यात येईल. जो अर्थातच त्यांच्यासाठी एक बहुमान असेल. मुख्य म्हणजे पर्य़टनामध्ये स्वारस्य असणाऱ्या अनेकांसाठी मंत्रालयाकडून बहुविध प्रमाणपत्र प्रशिक्षण सत्रांचंही आयोजन केलं जात आहे. पर्यटन क्षेत्राकडे अनेकांचा वाढता कल पाहता घेण्याच येणाऱ्या या निर्णयांचं सर्वच स्तरांतून उत्साहात स्वागत केलं जात आहे.