जहाजावर अडकलेले ते सात भारतीय खलाशी मागतायत जीवाची भीक

१६ भारतीय खलाशांची ही टीम गेल्या काही महिन्यांपासून शारजाजवळ समुद्रात अडकली आहे. 

Updated: May 31, 2018, 07:19 AM IST
जहाजावर अडकलेले ते सात भारतीय खलाशी मागतायत जीवाची भीक title=
प्रातिनिधिक फोटो

राजीव रंजन सिंह, झी मीडिया, मुंबई : वेगाने एकेकाळी समुद्र कापत जगप्रवास करत व्यापार करणाऱ्या जहाजांवरील नाविकांनी आज मदतीसाठी हाक दिलीय. समुद्रात अडकलेल्या या खलाशांकडे जहाज चालण्यासाठी डिझेल नाही. जहाजांवर अंधार आहे... शारजात अडकलेल्या झोया वन या जहाजावरील नाविकांनी नुकतीच सरकारला मदतीची याचना केली होती... आता कॅमेरूनमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून हालानी फाईव्ह या जहाजावर अडकलेल्या सात भारतीय  खलाशांनी मदतीसाठी धावा केलाय. 

१६ भारतीय खलाशांची ही टीम गेल्या काही महिन्यांपासून शारजाजवळ समुद्रात अडकली आहे. देशातल्या उच्चाधिकाऱ्यांना ते सातत्याने मदतीसाठी साद घालत आहेत. या खलाशांचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्र शारजा कोस्टगार्डकडे आहेत.  

ऑरम मरीन मॅनेजमेंट या कंपनीचे हे कर्मचारी... मात्र आता कंपनीनेही हात वर केलेत. या कर्मचाऱ्यांच्या अशा हालांबाबत कंपनीविरोधात तक्रारही दाखल करण्यात आलीय. 'झोया वन' या जहाजाचं हे प्रकरण ताजं असतानाच हालानी ५ या कॅमेरूनमध्ये अडकलेल्या जहाजाचंही प्रकरण बाहेर आलंय. मदतीसाठी हे सात भारतीय सातत्याने सरकारकडे याचना करत आहेत. त्यांच्याकडे केवळ दोन दिवसांचं रेशन उरलंय. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचा संघर्ष सुरू आहे. 

या कर्मचाऱ्यांची भारत सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी आता त्यांच्या भारतातल्या नातेवाईकांनीही केलीय. कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी कंपनीवर सातत्याने दबाव निर्माण केला जातोय. मात्र कंपनी कर्मचारी संघटनेलाही दाद देत नाहीय. एवढंच नाही तर परवानगी नसतानाही कंपनीने कर्मचाऱ्यांची भरती केल्याचं समोर आलंय. 

मुंबईत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी 'झी मीडिया'ने संपर्क साधला मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिलाय. जहाज विकण्याचे कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. जहाज विकलं गेल्यावरच या कर्मचाऱ्यांना इथून बाहेर काढता येईल असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय. आता या खलाशांचा जीव वाचवण्यासाठी केंद्र सरकारनेच तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे.