Indian Railways : प्रवासात आपल्याबरोबर अनेक किस्से, कधी काळी नवीन नातीही जोडली जातात. यातले काही त्यावेळेपुरते असतात तर काही संस्मरणीय ठरतात. असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवासात योगायोगाने दोन पिढ्या आमने सामने आल्याचा अतिशय खास क्षण कॅमेरात कैद झाला आहे.
रेल्वेने प्रवास करणार्यांसाठी ही नवीन गोष्ट नाही. मात्र, कधी कधी असे क्षण येतात की ते क्षण संस्मरणीय ठरतात. असाच काहीसा प्रकार रेल्वेत काम करणाऱ्या वडील आणि मुलासोबत घडला. जेव्हा दोघेही वेगवेगळ्या ट्रेनमध्ये होते आणि एका क्षणी दोघांच्या ट्रेन आमने सामने आल्या. हा खास क्षण मुलाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वडिल गार्ड तर मुलगा टीसी, अशी झाली भेट
मुलगा रेल्वेमध्ये ट्रॅव्हल तिकीट परीक्षक (TTE) काम करतो. तर वडिल रेल्वे विभागात गार्ड म्हणून नियुक्त आहेत. सेल्फीमध्ये वडिल आणि मुलगा दोघेही दोन वेगवेगळ्या ट्रेनमध्ये काही फूट अंतरावर दिसत आहेत. फोटो क्लिक करणारा मुलगा एका ट्रेनमध्ये ड्युटीवर असताना त्याचे वडील दुसऱ्या ट्रेनमध्ये दिसत आहेत. हा फोटो सुरेश कुमार यांनी ट्विट केला आहे.
सेल्फीमध्ये वडिल आणि मुलगा ट्रेनच्या दरवाजात दिसत असून दोघांनीही रेल्वेचा गणवेश परिधान केला आहे. सुरेश कुमार यांनी हा फोटो ट्विट करून लिहिले, 'अमेझिंग सेल्फी. वडील रेल्वेत गार्ड तर मुलगा टीटीई आहे. दोन गाड्या आमने सामने आल्यावर क्लिक झालेला एक सुंदर सेल्फी.
फोटो सोशल मीडियावर व्हायरल
हा सेल्फी नेमका कुठला आणि त्या दोन ट्रेन कोणत्या होत्या याचा उल्लेख ट्विटमध्ये नाही. पण या पोस्टला 28,000 हून अधिक लाईक्स आणि 1,700 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. एका ट्विटर युजरने 'हे बाप आणि मुलाचे प्रेम आहे' असे म्हटले आहे. 'खूप चांगला क्षण' असे आणखी एक ट्विट लिहिलं आहे. इतर अनेक युझर्सनेही या सुंदर क्षणाचे कौतुक केलं आहे.