मुंबई : भारतीय रेल्वेनं 'नो बिल, फ्री फूड पॉलिसी' लॉन्च केलीय.
म्हणजेच, तुम्ही भारतीय रेल्वेचा वापर करून प्रवास करत असाल आणि या प्रवासादरम्यान तुम्ही रेल्वेकडून जेवण मागवलं... पण त्याचं बिल मात्र तुम्हाला दिलं गेलं नाही तर तुम्ही बिलच भरू नका, असे निर्देशच रेल्वेमंत्र्यांनी दिलेत.
रेल्वेमध्ये अनेकदा जेवण ऑर्डर केल्यानंतर त्याचं बिल दिलं जात नाही... इतकंच नाही तर प्रवाशांकडून अनेकदा अधिक किंमत वसूल केली जाते. हे व्यवहार बंद व्हावेत यासाठी रेल्वेप्रशासनानं हे पाऊल उचललंय.
कोणत्याही प्रवाशानं आता प्रवासादरम्यान जेवण ऑर्डर केल्यास वेंडरला बिलाची मागणी करावी... एखाद्या वेंडरनं बिल देण्यास नकार दिला तर प्रवाशांनी जेवणाचे पैसे देऊ नये, असं रेल्वे प्रशासनानं म्हटलंय.
ज्या ट्रेन्समध्ये प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलीय त्या सर्व ट्रेनमध्ये या नव्या पॉलिसीची नोटीस ३१ मार्चपासून लावण्यात येईल.
ही योजना योग्य रितीनं कार्यरत होईल, याची जबाबदारी रेल्वे इन्स्पेक्टर्सकडे देण्यात येईल.