वारंवार घडणाऱ्या 'या' घटनांमुळे रेल्वेने घेतला निर्णय, प्रवाशांसाठी चिंताजनक बातमी

रेल्वे प्रवाश्यांसाठी एक चिंताजनक बातमी 

Updated: Mar 31, 2021, 12:01 PM IST
वारंवार घडणाऱ्या 'या' घटनांमुळे रेल्वेने घेतला निर्णय, प्रवाशांसाठी चिंताजनक बातमी title=

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाश्यांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. आता पश्चिम विभागाच्या गाड्यांमध्ये रात्री प्रवासी चार्जिंग पॉईंट उपलब्ध नसेल. सकाळी 11 ते पहाटे 5 या वेळेत वीजपुरवठा चार्जिंग पॉईंटवर बंद राहणार आहे. अशा परिस्थीतीत प्रवासी रात्री मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करू शकणार नाहीत. गाड्यांमध्ये आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागाने हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचा कोट्यवधी रेल्वे प्रवाशांवर परिणाम होणार आहे. या नियमानुसार रात्रीच्या प्रवासादरम्यान मोबाइल चोरीच्या घटना घडणार नाहीत. तसेच ओव्हर चार्जिंगमुळे मोबाइल स्फोट होण्याची शक्यताही संपेल असे सांगण्यात येत आहे.

चार्ज सॉकेटमुळे ट्रेनमध्ये आग!

13 मार्चला दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसमध्ये आग लागली होती. एका कोचमधून ही आग सुरु झाली आणि बघता बघता ही आग 7 डब्यांपर्यंत  पसरली. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रवाशाचे नुकसान झाले नाही. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. 

या घटनेनंतर रेल्वेने चौकशी समिती नेमली. ज्यामध्ये चार्जिंग सॉकेटमुळे रेल्वेच्या डब्यांमध्ये आग लागल्याचे समोर आले.

वर्ष 2014 मध्ये जाहीर केलेल्या एडवायजरीचे काटेकोरपणे पालन केले जाईल अस आगीच्या घटनेनंतर वेस्टर्न झोनने म्हटले. रेल्वेने 2014 मध्ये सर्व झोनसाठी एडवायजरी जाहीर केली होती. रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत प्रवाशांनी मोबाईल चार्ज करु नये. यामुळे आगीच्या घटना वाढतात आणि इतरांना देखील त्रास होतो असे यात म्हटले होते.