Indian Railways : जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेतून प्रवास करताना तुम्हाला उत्तम दर्जाचं शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) सब्सिडिअरी आयआरसीटीसीने (IRCTC) इस्कॉनशी करार केला आहे. या करारामुळे प्रवाशांना शुद्ध शाकाहारी जेवण करता येणार आहे. ज्या प्रवाशांना शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर इच्छूक प्रवाशी इस्कॉन मंदिराच्या गोविंदा रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करुन ट्रेनमध्ये जेवण करू शकतात.
अनेकदा असं आढळून आलंय की, लांबचा प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना शुद्ध शाकाहारी जेवणासाठी अडचणींना सामोरं जावं लागतं. ज्या प्रवशांना कांदा आणि लसून जेवणामध्ये नको असतं खासकरुन अशा प्रवाशांना जास्त त्रास होतो. तर, काही प्रवाशांना पेंट्रच्या जेवणावर संशय असतो. ज्या प्रवाशांच्या मनात पेंट्रीच्या जेवणाबद्दल संशय असेल त्या प्रवाशांसाठी तर ही उत्तम सोय झाली आहे. उत्तम दर्जाचं आणि निःशंक शाकाहारी जेवणासाठी इस्कॉनच्या गोविंदा रेस्टॉरंटचं जेवण योग्य पर्याय ठरु शकतो.
जर तुम्हाला शुद्ध शाकाहारी जेवणाचा आनंद रेल्वेचा प्रवास करताना घ्यायचा असेल तर यासाठी आयआरसीटीसीच्या (IRCTC) ई-कॅटरिंग वेबसाईट किंवा फूड ऑन ट्रॅक अॅपवर बूक करु शकता. प्रवाशांसाना ट्रेन सुटण्याआधी कमीत कमी दोन तास आधी पीएनआर नंबर (PNR Number) सोबत ऑर्डर करावं लागेल. यानंतरच तुम्हाला हे शुद्ध शाकाहारी जेवण तुमच्या जागेवर मिळेल.
आयआरसीटीसीने असं सांगितलंय की, धार्मिक यात्रांसाठी जाणारे लोकांना उद्देशून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनपासून यासेवेची पहिली फेज सुरु करण्यात आली आहे. पहिल्या फेजमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला तर या सेवेचा विस्तार केला जाणार आहे. मेन्यूमध्ये डीलक्स थाळी, महाराजा थाळी, जुन्या दिल्लीची वेज बिर्यानी, पनीरपासून बनलेल्या डिशेस, न्यूडल्स, दाळ मक्खनी आणि अनेक स्वादिष्ट डिशेसचा समावेश आहे.