Indian Railway Facts: जगातील सर्वात मोठ्या रेल्वेचं जाळं असणारी व्यवस्था म्हणून भारतीय रेल्वेचंही नाव पुढे येतं. भारतीय रेल्वे म्हणजे अनेकांसाठी कुतूहलाचा विषय. तुम्ही जर रेल्वेनं वारंवार प्रवास केला असेल तर एक गोष्ट लक्षात आली का?
रेल्वे इंजिनांमध्ये मोठे एअर हॉर्न वापरले जातात. हे हॉर्न यासाठी लावले जातात की गार्डपासून, रेल्वे कर्मचारी, प्रवासी आणि रेल्वेच्या मार्गावर येणारा प्रत्येकजण सतर्क होऊ शकेल.
तुम्ही वाचून हैराण व्हाल, पण रेल्वेमध्ये तब्बल 11 प्रकारचे हॉर्न असतात आणि प्रत्येक हॉर्नचा वेगळा अर्थ असतो.
लहान हॉर्न- जर, रेल्वे चालक शॉर्ट हॉर्न वाजवतो तर याचा अर्थ होतो की ती रेल्वे यार्डात आली आहे जिथं तिची साफसफाई होणार आहे.
दोन शॉर्ट हॉर्न - रेल्वे प्रवासासाठी तयार असताना चालक हे हॉर्न वाजवतो, जेणेकरुन ती निघण्यासाठी तयार असल्याचं सर्वांना कळतं.
तीन छोटे हॉर्न - आपात्कालीन प्रसंगी रेल्वेमध्ये तीन शॉर्ट हॉर्न वापरण्यात येतात. चालकानं इंजिनवरील ताबा गमावला असल्याचा गार्डसाठी हा एक प्रकारचा संकेत असतो. जेणेकरून तो वॅक्यूम ब्रेक खेचू शकेल. ही परिस्थिती फार कमी वेळा ओढावते.
चार शॉर्ट हॉर्न- कोणत्याही रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास चार शॉर्ट हॉर्न वाजवले जातात.
एक लाँग आणि एक शॉर्ट हॉर्न- अशा प्रकारचा हॉर्न वाजल्यास लक्षात घ्यायचं की रेल्वे चालक गार्डला ब्रेक पाईप सिस्टीम सेट करण्याचा इशारा देत आहे.
दोन लाँग आणि दोन शॉर्ट हॉर्न - चालक इंजिनाचं नियंत्रण घेण्यासाठीचा इशारा म्हणून गार्डला उद्देशून हा हॉर्न वाजवतो.
दोन शॉर्ट आणि एक लाँग हॉर्न- हा हॉर्न त्यावेळी वाजवला जातो जेव्हा कोणत्या ट्रेनमध्ये आपात्कालीन परिस्थितीत चैन खेचली आहे किंवा गार्डनं वॅक्युम ब्रेक लावला आहे.
सतत वाजणारा भोंगा - रेल्वे स्थानकावर न थांबताच थेट निघून जाणार आहे, याबद्दल सर्वांना सूचित करण्यासाठी अशा प्रकारचा हॉर्न किंवा भोंगा वाजवला जातो.
दोन वेळा थांबून वाजणारा हॉर्न - ट्रेन रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना हा हॉर्न वाजवला जातो. आजुबाजूला असणाऱ्या लोकांसाठी हा एक इशारा असतो.
दोन लाँग आणि एक शॉर्ट हॉर्न- प्रवासादरम्यान असा हॉर्न ऐकू आल्यास समजा की रेल्वेनं रुळ बदलला.
सहा छोटे हॉर्न - सतत सहावेळा छोटे हॉर्न चालक तेव्हाच वाजवतो जेव्हा रेल्वे एखाद्या अडचणीत अडकते. मदतीची हाक मारण्यासाठीचा हा हॉर्न आहे असं म्हणायला हरकत नाही.