Indian Railway : भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करत अपेक्षित स्थळी पोहोचणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. थोडक्यात रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सुविधा आणि समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी करण्यात आलेली प्रवासाची तरतूद पाहता रेल्वेच्या प्रवाशांचा आकडा दर दिवशी वाढत आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. रेल्वेच्या बहुतांश मार्गांमुळं देशातील अनेक कानाकोपऱ्यांमधील गावंही मुख्य प्रवाहाशी जोडली गेली आहेत. पण, प्रवाशांना सुविधा देणाऱ्या रेल्वे विभागाला मात्र सध्या काही अडचणींचा सामना करावा लागत असून, या अडचणी काही अंशी अतिउत्साही प्रवाशांमुळंच निर्माण झाल्या आहेत असं निदर्शनास येत आहे.
रेल्वे प्रशासनाच्या वतीनं प्रवाशांसाठी 139 हा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. यावर प्रवाशांना फोन अथवा एसएमएस करण्याची मुभाही देण्यात आली आहे, जिथं त्यांना सहजपणे मदत देता येईल. या क्रमांकाचा वापर करतस प्रवाशांच्या तक्रारींचं निवारणही करता येणार आहे.
प्रत्यक्षात मात्र प्रवासी या क्रमांकावर संपर्क साधत काही विचित्र मागण्या करत असल्यामुळं आता रेल्वे प्रशासनापुढं भलतीच अडचण निर्माण झाली आहे. ज्या क्रमांकावर प्रवाशांना चौकशी, मदत, रेल्वेची स्थिती, भाडं, तक्रार या आणि अशा गोष्टंची चौकशी करण्याची मुभा देण्यात आली आहे त्याच क्रमांकावर काही प्रवाशी चक्क समोसा मिळेल का? राईस प्लेट मिळेल का? असेही प्रश्न विचारताना दिसत आहेत.
IRCTC च्या संकेतस्थळावर किंवा क्रमांकावर संपर्क साधण्याऐवजी काहीजण या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधत तिथं प्रवासादरम्यान कोणते खाद्यपदार्थ मिळणार, खाद्यपदार्थ मागवण्यासाठीचा क्रमांक कोणता या आणि अशा विचित्र मागण्या आणि चौकशीही करत आहेत. परिणामी आता प्रवाशांनी या क्रमांकाचं महत्त्वं जाणत अनपेक्षित मागण्या करु नयेत, ही बाब लक्षात घ्यावी.
रेल्वे प्रवाशांना मदत, चौकशी, तपासणी, रेल्वेची स्थिती, भाडं आणि तक्रार दाखल करण्यासाठी वरील क्रमांकावर संपर्क साधून सहज मदत मिळवता येऊ शकते. या क्रमांकांवर रेल्वे अधिकाऱ्यांकडूनच तुम्हाला मदत मिळू शकते. विविध भाषांमध्ये तुम्ही या क्रमांकावर मदत मिळवू शकता. जिथं, मराठीचाही पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळं इथून पुढं रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी योग्य क्रमांकाचा वापर करा.