मोबाईलवर समजणार रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा

रेल्वेत आयआरसीटीसीकडून पुरविण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांच्या पाकिटावर बारकोड असणार आहे.     

Updated: Feb 26, 2019, 04:57 PM IST
मोबाईलवर समजणार रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा title=

मुंबई : लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी अनेकदा आपण रेल्वे प्रवासाला पसंती देतो. प्रवासादरम्यान अनेकदा आपण रेल्वेत मिळणाऱ्या जेवणाला आणि खाद्यपदार्थांना पसंती देतो. पण अनेकदा रेल्वेतून मिळणाऱ्या जेवणाबद्दल शंका निर्माण केली जाते. तसेच रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थ तसेच जेवण हे निकृष्ट दर्जाचे असते, अशी तक्रार सर्रासपणे प्रवाशांकडून केली जाते. या अशा समस्यांना आळा घालण्यासाठी  रेल्वे प्रशासनानने एक पाऊल उचलले आहे. आता तुम्हाला मिळालेले खाद्यपदार्थ किंवा जेवण हे रेल्वेतील कोणत्या किचनमध्ये शिजवले आहे, तसेच ते जेवण केव्हा पॅक केलं आहे, या सर्वाची माहिती प्रवाशांना आपल्या मोबाईलवर मिळणार आहे. 

इ-दृष्टीची स्थापना

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या 'इ-दृष्टी' या वेबसाईटचे लोकार्पण केले. रेल्वेत आयआरसीटीसीकडून पुरविण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांच्या पाकिटावर बारकोड असणार आहे. तसेच ते अन्नपदार्थ रेल्वेतील ज्या किचनमध्ये शिजवले आहे, त्या किचनचा नंबर आणि ते पाकिट पॅक केल्याची वेळ त्या पाकिटावर देण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

वेळ समजणार

लांब पल्ल्याच्या प्रवासात आयआरसीटीसीकडून रेल्वेत प्रवाशांना अन्नपदार्थांची सोय केली जाते. पण रेल्वेत मिळणारे अन्नपदार्थ हे शिळे असतात, त्यात वापरण्यात येणारे पदार्थ हे निकृष्ट दर्जाचे असतात, अशी शंका प्रवाशांना असते. प्रवाशांमध्ये असलेल्या या व इतर अनेक शंकांना दूर करण्यासाठी रेल्वने ही शक्कल शोधली आहे. जेवणाच्या पाकिटावर आयआरसीटीसीच्या किचनचा नंबर तसेच ते पाकीट केव्हा बंद करण्यात आले याची माहिती देण्यात येणार आहे. असे पियुष गोयल म्हणाले.

रेल्वे सूचना प्रणालीद्वारे निर्माण करण्यात आलेली नवी वेबसाईट https://raildrishti.cris.org.in यावर जाऊन प्रवाशांना ज्या ठिकाणी अन्नपदार्थ शिजवले जातात, त्या ठिकाणी असलेली स्वच्छता आणि अन्न पदार्थ शिजवताना घेतली जाणारी काळजी, तसेच तेथील परिसर हे सर्व प्रवाशांना आपल्या मोबाईलवर पाहता येईल. तसेच देशात असलेल्या रेल्वेच्या प्रमुख किचनमधील दृश्य पाहता येईल.

रेल्वेमंत्र्यांचे आदेश

रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, आयआरसीटीसीच्या वार्षिक बैठकीवेळी रेल्वेमंत्र्यानी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर बारकोड लावण्याबदद्लची संकल्पना सुचवली होती. आयआरसीटीसी बारकोडच्या या संकल्पनेवर काम करत असून, ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी किती खर्च होईल, तसेच याचा भविष्यात किती फायदा होईल याची समीक्षा केली जात आहे, असे रेल्वेमंत्री म्हणाले.

वाढत्या तक्रारी

रेल्वेत मिळणारे अन्नपदार्थ निकृष्ट आणि शिळे असते, अशी तक्रार केली जाते. या सर्व तक्रारींना आळा घालता यावा यासाठी नव्या प्रणालीचा रेल्वेकडून स्वीकार केला जात आहे. बारकोड असलेल्या अन्नपदार्थच्या पाकिटाच्या सेवेची सुरुवात होण्यासाठी एप्रिल किंवा मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांने दिली.

ऑथेंटिकेशन सर्व्हिस प्रोवायडर्स

खाद्यपदार्थांच्या पाकिटावर बारकोड लावण्याच्या निर्णयाचा ऑथेंटिकेशन सर्व्हिस प्रोवायडर्स संघटनेने स्वागत केलं आहे. संघटनेकडून सांगण्यात आले की, अनेकदा खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते. जर पदार्थ पाकीटबंद दिले आणि त्यावर बारकोड असेल तर त्यात भेसळ करता येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व घटना आपोआप बंद होतील.