माजी लष्करप्रमुख नरवणेंनी शेअर केला 'चीनचा खरा नकाशा'; म्हणाले, 'अखेर कोणाला तरी...'

Indian Army Ex Chief Manoj Naravane Post: भारताचे माजी लष्कर प्रमुख नरवणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट करत चीनला लक्ष्य केलं असून हा फोटो व्हायरल झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 14, 2023, 12:46 PM IST
माजी लष्करप्रमुख नरवणेंनी शेअर केला 'चीनचा खरा नकाशा'; म्हणाले, 'अखेर कोणाला तरी...' title=
नरवणे यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे

Indian Army Ex Chief Manoj Naravane Post: भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी हेकेखोरी करणाऱ्या चीनला सणसणीत टोला लगावला आहे. नरवणे यांनी त्यांच्या 'एक्स' म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन चीनचा एक नकाशा शेअर करत भारताच्या शेजारच्या देशाला लक्ष्य केलं आहे. चीनचा नकाशा शेअर करत अगदी मोजक्या शब्दांमध्ये नरवणे यांनी टीका केली आहे. चीन खरोखर जसा आहे तसा नकाशा अखेर कोणाला तरी सापडला, असा टोला नरणवणे यांनी लागवला आहे. नरवणे यांनी शेअर केलेल्या या नकाशामध्ये चीनचा एकूण प्रदेश कशाप्रकारे वेगवेगळ्या भूभागांवर केलेल्या अतिक्रमण आहे हे दर्शवण्यात आलं आहे.

नरवणे काय म्हणालेत?

नरवणे यांनी शेअर केलेल्या नकाशामध्ये तिबेटसहीत इतर अनेक भागांवर चीनने 'बेकायदेशीररित्या ताबा' मिळवला आहे हे दर्शवण्यात आलं आहे. वेगवेगळ्या रंगांमध्ये चीनच्या नकाशात हे भाग दाखवण्यात आले आहेत. हा चीनचा खरा नकाशा असल्याचा टोला नरवणे यांनी कॅप्शनमधून लगावला आहे. चीन जगभरामध्ये विस्तारवादासाठी कुप्रसिद्ध आहे. याच अनुषंगाने नरवणे यांनी टीका केली आहे. "अखेर कोणाला तरी चीन वास्तवात जसा आहे तसा खरा नकाशा सापडला आहे," अशी कॅप्शन नरवणे यांनी दिली आहे. 

चीनला जशास तसं उत्तर

'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालातील नकाशामध्ये तैवान, हाँगकाँग, यूननासारख्या चीनच्या सीमा भागातील देशांना चीनच्या ताब्यातील प्रदेश म्हणून दर्शवण्यात आलं आहे. भारत आणि चीनच्या नकाशावरुन चीनकडून कुरापती सुरु असतानाच नरवणे यांनी चीनला लक्ष्य करणारा हा नकाशा शेअर केला आहे. या नकाशामध्ये हाँगकाँग, तिबेट, दक्षिण मंगोलिया आणि यूनाना, पूर्व तुर्कमेनिस्तान आणि मनचुरियासारख्या देशांमधील भूभागावर ताबा मिळवून चीनने आपल्या सीमा आखल्याचं या फोटोत दर्शवलं आहे. चीन अनेकदा आपल्या आजूबाजूच्या देशांवरील भूप्रदेशावर दावा सांगत असतो. चीनने 28 ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या नकाशामध्ये तैवान, अक्साई चीन आणि भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्याला आपला भूभाग म्हणून दाखवला होता. याचा भारताने कठोर शब्दांमध्ये विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर आता नरणवे यांनी चीनला जशास तसं उत्तर दिलं आहे. 

भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही चीनला झापलं

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी असे बिनबुडाचे दावे केल्याने शेजारच्या देशातील भूभाग आपला होत नाही असा टोला चीनला लगावला होता. चीनला ही जुनी सवय असल्याचंही जयशंकर म्हणाले होते. असल्या नकाशांना आम्हा फारसं महत्त्व देत नाही असंही भारताकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये चीनने भारत-चीन सीमाभागातील वेगवगेळ्या ठिकाणींची नावं बदलल्याची यादी जारी केली होती. यामध्ये 11 ठिकाणांच्या यादीमध्ये भारतातील काही ठिकाणाचाही समावेश होता.