पाकिस्तानची अजून जिरली नाही; पुन्हा ड्रोन धाडलं, भारताने ते पाडलं

भारतीय सैन्याने पाकिस्तानचे आणखीन एक ड्रोन पाडले आहे.  

Updated: Mar 9, 2019, 09:44 PM IST
पाकिस्तानची अजून जिरली नाही; पुन्हा ड्रोन धाडलं, भारताने ते पाडलं title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पाकिस्तानचे आणखीन एक ड्रोन पाडले आहे. राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवर श्री गंगानगर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याचे ड्रोन पाडले. २६ फेब्रुवारीच्या एअर स्ट्राईकनंतर भारताने पाडलेले पाकिस्तानचे हे तिसरे ड्रोन आहे. राजस्थानच्या सीमेवरुन पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. श्रीगंगानगर जवळ असलेल्या हिंदूमालकोट सीमेवरुन हे ड्रोन भारताच्या हवाई हद्दीत घुसले. मात्र भारतीय रडार स्थानकाने या ड्रोनची नोंद घेतल्यानंतर काही मिनिटांतच हे ड्रोन पाडण्यात आले.

पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने गोळीबार करण्यात येत आहे. तसेच अतिरेकी पाठविण्याची मोहीमही पाकिस्तानच्या लष्कराकडून सुरुच आहे. पाकिस्तानच्या कारवाया थांबण्याचे नाव घेत नाही. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने हवाई दलाच्या माध्यमातून पाकिस्तान हद्दीतील बालाकोटवर तुफान हल्ला चढवला. तेथील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्यानंतरही पाकिस्तान हेरगिरी करण्यासाठी ड्रोन पाठवत आहे. मात्र, भारताने पुन्हा पाकिस्तानला दणका दिला आहे. याआधी राजस्थान येथील  बिकानेर भागात ड्रोन पाडले होते. आता पाडलेले हे तिसरे ड्रोन आहे.

दरम्यान, भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाकडून (बीएसएफ) घुसखोरी करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील रण ऑफ कच्छच्या भारत-पाकिस्तान सीमेवरून ही कारवाई करण्यात आली. तसेच काश्मीरच्या पुलवामा परिसरात बुधवारी भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत दहशतवाद्यांच्या तळावर छापा टाकला. यावेळी भारतीय लष्कराच्या हाती मोठा शस्त्रसाठा लागला. पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लष्कराकडून मोठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी काश्मीरमध्ये सैन्याच्या अतिरिक्त तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.