कंगना रनौतच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला काय शिक्षा होणार? काय सांगतो कायदा

Kangana Ranaut Slapped Controversy: चंदीगड विमानतळवार CISF महिला सुरक्षा रक्षक कुलविंद कौरने भाजप खासदार कंगना रनौतच्या कानशिलात लगावली. कंगना रनौत चंदीगडहून दिल्लीला जात असताना ही घटना घडली. सशस्त्र दलामध्ये असल्याने कुलविंदरला किती शिक्षा मिळणार, काय सांगतो कायदा?

राजीव कासले | Updated: Jun 7, 2024, 05:07 PM IST
कंगना रनौतच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला काय शिक्षा होणार? काय सांगतो कायदा title=

Kangana Ranaut Slapped Controversy: हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून निवडुन आलेल्या भाजपची नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतला (Kangana Ranaut) चंदीगड विमानतळावर CISF च्या महिला सुरक्षा रक्षकाने कानशिलात लगावली. कंगना रनौत चंदीगडहून दिल्लीला जात असताना ही घटना घडली. या घटनेनंतर CISF महिला सुरक्षा रक्षक कुलविंदर कौरला (Kulwinder Kaur) ताब्यात घेण्यात आलं आहे . तिची चौकशी केली जात असून तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

खासदाराला मारण्याची शिक्षा किती आहे? सशस्त्र दलात असल्याने महिला सुरक्षा रक्षकाला काय शिक्षा मिळणार? यासाठी तुरुंगवास आणि दंड दोन्ही लागू होतात का? यावर कायदा काय सांगतो? असे प्रश्न विचारले जात आहेत. 

कुलविंदरला काय शिक्षा होणार?
कानशिलात मारल्याप्रकरणी आयपीसीची वेगवेगळी कलमं लावली जाऊ शकतात. कोणत्या परिस्थितीत मारहाण केली यावर कोणती कलमं लावली जाणार हे अवलंबून आहे. कानशिलात लगावण हे गुन्ह्याच्या श्रेणीत येतं. यासाठी आयपीसी कलम 323 अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई केली जाऊ शकते. कलम 323 म्हणजे, जर कोणी जाणूनबुजून एखाद्याला इजा किंवा फसवणूक केली तर त्याला एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा एक हजार रुपये दंड,  किंवा तुरुंगवास आणि दंड दोन्ही होऊ शकतात.

समोरच्या व्यक्तीने गैरवर्तन केलं  आणि उत्तर म्हणून दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या कानशिलात लगावली, तर या प्रकरणात शिक्षा बदलली जाऊ शकते आणि गुन्हा रद्द केला जाऊ शकतो. पण एखाद्या व्यक्तीला घाबरवण्याच्या उद्देशाने दुसऱ्या व्यक्तीने हल्ला केला असेल तर किंवा ईजा पोहोचवली असेल तर अशा व्यक्तीवर आयपीसी कलम 358 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

भारतीय दंड संहितेच्या कलम 352 नुसार जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही कारणाशिवाय पीडित व्यक्तीवर हल्ला केला तर अशा व्यक्तीला तीन महिने तुरुंगवास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. आता कुलविंदर कौरला कोणती शिक्षा होणार, तिच्यावर कोणत्या कलमातंर्गत कारवाई केली जाणार हे तपासानंतर स्पष्ट होईल.

CISF महिला सुरक्षा रक्षकाला किती शिक्षा?
कुलविंदर कौरचं प्रकरण वेगळं आहे. ती सशस्त्र दलात आहे. कानशिलात लगावल्यानंतर खासदाराला आणखी इजा करण्याचा तिचा प्रयत्न होता का? ड्यूटीवर तैनात असताना तिने हल्ला केला, हे देखील तपासात गृहित धरलं जाईल. CISF कडून तिच्यावर कारवाई केली जाईल. सध्या कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आलं आहे.