भारत-कॅनडा वादात भारताविरुद्ध जाणार नाहीत अमेरिका, ब्रिटन! जाणून घ्या 3 कारणे

India vs Canada Khalistan : भारत आणि कॅनडादरम्यानचा तणाव आता वाढत चालला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहे. याला भारतानेही चोख उत्तर दिलंय. पण या प्रकरणाचा पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटायला सुरुवात झाली आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 22, 2023, 04:03 PM IST
भारत-कॅनडा वादात भारताविरुद्ध जाणार नाहीत अमेरिका, ब्रिटन! जाणून घ्या 3 कारणे title=

India vs Canada : खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) यांच्या हत्येमागे भारताचा सहभाग असल्याचा बेछुट आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो (Justin Trudeau) यांनी संसदेमध्ये केला आणि भारत-कॅनडादरम्यान (India vs Canada) संघर्षाला सुरुवात झाली. निज्जर यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यात भारताचा सहभाग असल्याची शक्यता जस्टिन टुडो यांनी वर्तवली होती. जस्टीन टुडो यांनी केलेल्या आरोपांना भारतानेही चोख उत्तर दिलं. त्यामुळे भारत आणि कॅनडामध्ये प्रचंड तणाव वाढलाय.

भारताचं चोख प्रत्युत्तर
कॅनडात गेल्या अनेक दिवसांपासून भारताविरोधात खलिस्तानी (Khalistani) आक्रमक झालेत. खलिस्तान्यांनी हिंदू मंदिरांवर हल्ले केले. भारताविरोधात मोर्चे काढले. मात्र कॅनडातील जस्टीन ट्रुडो सरकारनं कोणतीही कारवाई केलेली नाही. याच्या निषेधार्थ भारतानं कठोर पाऊल उचललं. भारताने कॅनडासाठी व्हिसा सेवा स्थगित केली. कॅनडातून भारतात येणाऱ्या कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत भारतानं कॅनडावर कडक कारवाई करण्याची ही तिसरी वेळ आहे. भारतानं कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांचीही हकालपट्टी केली. कॅनडानं निज्जरच्या हत्येप्रकरणी भारताविरोधात पुरावे द्यावेत असं थेट आव्हान परराष्ट्र मंत्रालयानं दिलंय. 

पाकिस्तान्यांचा पाठिंबा
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIमार्फत खलिस्तानी दहशतवाद्यांना पैसा पुरवाला जात असल्याचा भारतीय गुप्तचर यंत्रणांना संशय आहे. मात्र तिथलं ट्रुडो सरकार खलिस्तान्यांच्या भीतीपोटी बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोपही भारताने केला आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद
भारत-कॅनडा वादाचे पडसाद आंतराष्ट्रीय स्तरावर उमटले आहेत. ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड हे 'आय 5' या गटाचे सदस्य आहेत. त्यामुळे कॅनडाने या देशांना सहकार्याचं आवाहन केलं आहे. पण ब्रिटनच्या संसदेतील लेबर पार्टीचे शीख खासदार तन्मनजीत सिंग धेसी यांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे सुरुवातीला सावध भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने आता आपले सूर बदलले आहेत. निज्जर याच्या हत्या प्रकरणी कॅनडा करत असलेल्या तपासाला अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी अॅडव्हायझर जेक सुलिवन यांनी पाठिंबा देत असल्याचं म्हटलंय. पण उघडपणे अमेरिका आणि ब्रिटन या वादात पडण्याची शक्यता कमीच आहे. कारण...

एकाची निवड करणे शक्य नाही
भारत आणि कॅनडा दोन्ही कॉमनवेल्थ देश आहेत. त्यातच  ब्रिटन आणि अमेरिकेचे हे घनिष्ठ मित्रही आहेत. कोणत्या एका देशाला पाठिंबा देणं ब्रिटन आणि अमेरिकेला परवडणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष वादात उडी घेण्यासाठी कुठलाही देश तयार होणार नाही.

भारताचे दक्षिण आशियात वाढतं वर्चस्व
नुकतेच झालेल्या जी२० संमेलनात भारताचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. भारत केवळ झपाट्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा देश नाही तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये भारत एक नेतृत्व म्हणून समोर येत आहे.

चीनविरोधात भारत सर्वात बलाढ्य सहकारी
अमेरिका आणि ब्रिटनची रशियानंतर सर्वात मोठी स्पर्धा चीनसोबत आहे. चीनला नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला दाबण्यासाठी भारत सर्वात प्रभावी देश आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनने एकाधिकारशाही गाजवल्यास भारताच्या सोबत येऊन पाश्चात्य देश चीनला उत्तर देऊ शकतात. व्यापारात चीन सहकार्य करत नसेल तर भारत हाच एक पर्याय ठरू शकतो हे अमेरिका आणि ब्रिटनला ठाऊक आहे.