गेल्या 24 तासात दिल्लीत 14 तर उत्तर प्रदेशमध्ये 81 लोकांचा मृत्यू... नेमकं काय घडतंय?

HeatWave : देशात गेल्या 24 तासात दिल्लीत 14 लोकांचा तर उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 81 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या कानपूरमध्ये 13 लोकांना जीव गमवावा लागलाय. यामुळे उत्तर प्रदेशमधल्या अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 19, 2024, 06:18 PM IST
 गेल्या 24 तासात दिल्लीत 14 तर उत्तर प्रदेशमध्ये 81 लोकांचा मृत्यू... नेमकं काय घडतंय? title=

HeatWave : देशात गेल्या 24 तासात दिल्लीत 14 लोकांचा तर उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 81 लोकांचा मृत्यू झाला आहे.  यामुळे उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.  दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये सूर्य आग ओकतोय. उष्णतेच्या लाटेने (Heat Wave) या राज्यात कहर केला आहे. अनेकजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जून महिन्यात उष्माघाताच्या (Heat Stroke) रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रुग्णालयातील बेडची संख्या लक्षात घेता ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, त्यांनाच दाखल करुन घेतलं जात आहे. ज्या रुग्णांची प्रकृती काहीशी स्थिर आहे, त्यांना औषधे देऊन घरी पाठवले जात आहे.

एकटा कानपूरमध्ये तेरा मृत्यू
उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार एका कानपूरमध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर फतेहपूरमध्ये 12, चित्रकुटमध्ये 9, उन्नावमध्ये 6, बांदामध्ये 4, उरईमध्ये 6, इटावा, प्रतापगडमध्ये 4, तर बरेली, प्रयागराज आणि कौशंबी जिल्ह्यात प्रत्येक एकाचा मृत्यू झाला आहे. वाराणसी, मऊ, गाजीपूर, मिर्झापूर, चंदौली, जौनपूर, बलिया, सोनभद्र या जिल्ह्यात 23 लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे चार दिवस उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. यामुळे अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

कानपूरमध्ये प्रचंड उष्णतेमुळे एक हेड कॉन्स्टेबल चक्कर येऊन पडला. पण त्याच्या सहकारी त्याला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी त्याचा व्हिडिओ बनवत बसला. जेव्हा लोकांनी त्याला विरोध केला. त्यावेळी हेड कॉन्स्टेबलला रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

उष्माघाताने लोकं आजारी
उष्माघाताने लोकांना ताप, चक्कर आणि डोकेदुखीची समस्या जाणवू लागली आहे. यामुळे लोकांचा मृत्यूसुद्धा होत आहे. हातावर पोट असणारे कामासाठी बाहेर पडतायत,पण उष्माघाताने ते आजारी पडत आहेत. रुग्णालयात सर्वात जास्त रुग्ण उष्माघाताचे आहेत. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्याने डॉक्टरांना अलर्ट मोडवर राहाण्यास सांगण्यात आलं आहे. कामाशिवाय बाहेर जाणं टाळावं, तसंच बाहेर जाताना पुरेशी काळजी घ्यावी आणि पाण्याची बाटली सोबत ठेवावी असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.

नोएडात 14 लोकांचा मृत्यू
दुसरीकडे नोएडात गेल्या 24 तासात 14 लोकांचा संशयास्पद मृत्यू झालाय. उष्माघाताने या सर्वांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. नोएडात 6 ते 7 अज्ञात मृतदेह आढळून आले आहेत. पोस्टमॉर्टम नंतर त्यांच्या मृत्यूचं खरं कारण समजू शकेल असं नोएडाच्या CMO रेनू अग्रवाल यांनी म्हटलंय.