Gujarat 10th Board Topper : गुजरात माध्यमिक बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून वडोदरातल्या एका पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलीने परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. या मुलीने दहावीत तब्बल 99.72 टक्के मिळवले. तिच्या या यशानं आई-वडिलांच्या कष्टाचं चीज झालं आहे. संपूर्ण राज्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
वडोदरात गेल्या 25 वर्षापासून पाणीपुरीचा ठेला लावत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या प्रकाश कुशवाहा यांची मुलगी पूनमने यावर्षी गुजरात माध्यमिक बोर्डाची परीक्षा (Gujrat Board 10th Topper) दिली. नुकताच गुजारत माध्यमिक बोर्डाचा दहावीचा निकाल लागला. यात पुनमला 99.72 टक्के गुण मिळाले. पूनमने निकाल जाहीर होताच तिच्या कुटुंबामध्ये आणि ती राहात असलेल्या परिसरात एकच जल्लोष झाला. लहान घरात राहाणाऱ्या पुनमने आर्थिक परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पुनमने वैदयकीय क्षेत्रात शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आहे.
पूनमचा संघर्ष
पूनमचा संघर्ष हा अनेक मुलांसाठी प्रेरणादायी आहे. पूनमचे वडिल प्रकाश कुशवाह हे वडोदरातल्या (Vadodara) एका रस्त्यावर गेली पंचवीस वर्ष पाणीपुरीचा ठेला लावतात. अल्प उत्पन्नामुळे प्रकाश कुशवाह यांची आर्थिक परिस्थिती तशी बिकटच आहे. पण मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी कधीच कमी पडू दिलं नाही. अभ्यासातून वेळ काढून पूनम आपल्या वडिलांना पाणीपुरीच्या ठेल्यावर मदत करायची. तर घरकामात आईलाची तिची मदत व्हायची. पण आपल्या आर्थिक परिस्थितीचा पूनमने कधीच बाऊ केला नाही. जितका वेळ मिळेल त्या वेळेत पूनमने मन लावून अभ्यास केला.
तिच्या कठोर मेहनतीला अखेर यश मिळालं. निकाल आल्यानंतर पूनमला शुभेच्छा देणाऱ्यांची आता घरी रिघ लागली आहे. संपूर्ण गावात आनंदाचा वातावरण असल्याचं पूनची आई अनिता कुशवाह यांनी सांगितलं.
सीबीएससी परीक्षेचाही निकाल
दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सीबीएसई बोर्डातील बारावीचे 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 6.40 टक्क्यांनी चांगला लागला आहे. यावर्षी 91.52 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 85.12 टक्के मुलं पास झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल cbse.gov.in, cbse.nic.in, results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.