Pak Terrorist : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना एक एक करुन संपवलं जात आहे. अज्ञात बंदूकधारी पाकिस्तानपासून कॅनडापर्यंत भारताच्या शत्रूंना मारत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या अज्ञात हल्लेखोरांविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हल्लेखोरांचे लक्ष्य हे भारत सरकारला हवे असलेल्या दहशतवादी आहेत. पण आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पहिल्यांदाच या हत्यांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जे लोक भारतीय अधिकाऱ्यांना हवे आहेत त्यांनी येथे येऊन कायद्याला सामोरे जावे, असे गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
गुरुवारी पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केलं आहे. भारत सरकारची या विषयावर कोणतीही भूमिका नाही. गुन्हेगारांना भारतीय कायदेशीर व्यवस्थेला सामोरे जावे, अशी भारताची अनेक दिवसांपासून मागणी आहे, असे अरिंदम बागची म्हणाले. "ज्यांना भारतात गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांसाठी न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांनी भारतात येऊन आमच्या कायदेशीर व्यवस्थेला सामोरे जावे अशी आमची इच्छा आहे. ते करा पण मी पाकिस्तानात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करू शकत नाही," असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.
दुसरीकडे, खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने 13 डिसेंबरला संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिल्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. आम्ही धमक्या गांभीर्याने घेतो. धमक्या देणाऱ्या अतिरेक्यांना मी प्रोत्साहन देऊ इच्छित नाही किंवा त्यांना जास्त महत्त्व देऊ इच्छित नाही. आम्ही हे प्रकरण अमेरिका आणि कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडे मांडले आहे. अतिरेकी आणि दहशतवाद्यांचा एखाद्या मुद्द्यावर मीडिया कव्हरेज घेण्याचा कल असतो, असेही बागची म्हणाले.
#WATCH | On terrorists' being killed by unknown gunmen in Pakistan, MEA Spokesperson Arindam Bagchi says, "...Those who are wanted in India to face justice for criminal and terrorist activities, we would like them to come to India and face our legal system but I cannot comment on… pic.twitter.com/5ua9KXg9Ok
— ANI (@ANI) December 7, 2023
दरम्यान, आतापर्यंत अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानात भारताच्या शत्रूंचा खात्मा केला आहे. 2 आणि 3 डिसेंबर 2023 च्या मध्यरात्री, लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनान याची पाकिस्तानातील कराची येथे त्याच्या घराजवळ अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. कडेकोट बंदोबस्तात अदनानवर घराबाहेर हल्ला करण्यात आला. याआधीही मुफ्ती कैसर फारुख, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीर यांसारख्या अनेक दहशतवाद्यांनाही अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले होते.