चीनकडूनच भारतीय लष्कराच्या कामात अडथळा; परराष्ट्र मंत्रालयाचा दावा

काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये तणावाचं हे वातावरण वाढलं होतं..... 

Updated: May 21, 2020, 08:34 PM IST
चीनकडूनच भारतीय लष्कराच्या कामात अडथळा; परराष्ट्र मंत्रालयाचा दावा  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या लष्करामध्ये लडाख येथे उदभवलेल्या तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून अतिशय महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. 

भारतीय सीमांतर्गत भागाविषयी आपण चांगल्या पद्धतीने जाणून आहोत. चीनच्या लष्कराने भारतीय सैन्याच्या हद्दीत गस्त घालणं सुरु असताना त्यामध्येच व्यत्यय आणला. भारतीय सैनिक देशाच्या सीमेलगतच गस्त घालत, कारवाई करत होते, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सदर प्रकरणी दोन्ही पक्षांशी चर्चा सुरु असून या मुद्द्यावर शांततेच्या मार्गानं तोडगा काढण्यासाठी आपण बांधिल असल्याचं स्पष्ट केलं.

श्रीवास्त यांच्या म्हणण्यानुसार, 'भारतीय सैन्याकडून सिक्कीम येथे एलएसी ओलांडल्याची कोणतीही घटना घडली नाही. किंबहुना भारतीय लष्कराला या दोन्ही देशांतील परिस्थितीची माहिती असून,  ते अतिशय प्रामाणकपणे नियमांचं पालन करत आहेत.'

 

भारत आणि चीनमध्ये असणाऱ्या नियंत्रण रेषेला एलएसी म्हणून संबोधलं जातं. याचविषयी सांगताना श्रीवास्तव यांनीही काही मुद्दे स्पष्ट केले. ज्यामध्ये त्यांनी वारंवार चीनकडूनच भारतीय लष्कराच्या कार्यपद्धतीमध्ये कुरापती करण्यात येत असल्याचीच बाब त्यांनी वारंवार अधोरेखित केली.