Independence Day 2023 : 15 ऑगस्ट हा प्रत्येक देशवासीयांसाठी मोठ्या गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस मानला जातो. यंदाच्या वर्षी आपण 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा (Independence Day) करणार आहोत. याच दिनानिमित्त आपण देशाच्या स्वातंत्र्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त झालेला भारत सध्याच्या भारतापेक्षा वेगळा होता. त्यावेळी देशातील बरेच महत्त्वाचे भाग स्वतंत्र भारताचा भाग नव्हते. जाणून घेऊया 1947 नंतर भारतातील कोणत्या राज्यांना स्वातंत्र्य मिळालं.
स्वातंत्र्य काळात हैदराबाद संस्थानावर निजामाचे राज्य होतं. यावेळी ज्यांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याऐवजी स्वातंत्र्य हवं होतं. भारत सरकारने निजामाला भारतात सामील होण्याचा आग्रह केला, परंतु त्यांनी नकार दिला. हैदराबाद ब्रिटीश कॉमनवेल्थचे सदस्य व्हावे अशी नवाबाची इच्छा होती. अखेरीस भारत हैदराबादशिवाय स्वतंत्र झाला.
यानंतर भारत सरकारने 1948 मध्ये "ऑपरेशन पोलो" नावाची लष्करी मोहीम सुरू केली. एकूणच हे ऑपरेशन 108 तास चालले आणि हैदराबाद हा भारताचा अविभाज्य भाग झाला.
जुनागढ हे आधुनिक गुजरातमध्ये स्थित एक संस्थान होतं. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा गुजरातच्या दक्षिण-पश्चिम राज्यातील जुनागढ हे आणखी एक राज्य भारतात सामील झाले नव्हतं. या राज्याची बहुसंख्य लोकसंख्या हिंदू होती आणि राजा मुस्लिम होता. जुनागढचे नवाब मोहब्बत महाबत खानजी यांनी माउंटबॅटनच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून 15 सप्टेंबर 1947 रोजी पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
मात्र भारत सरकारने फेब्रुवारी 1948 मध्ये जनमत संग्रह आयोजित केला. जुनागडच्या लोकांनी भारतामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. आणि तो भारतीय संघराज्याचा एक भाग बनवला.
जम्मू आणि काश्मीर हे संस्थानांच्या विलीनीकरणाच्या सर्वात उल्लेखनीय उदाहरणांपैकी एक मानलं जातं. या संस्थानावर महाराजा हरिसिंह यांचे राज्य होते. राज्यातील सुमारे तीन चतुर्थांश लोकसंख्या मुस्लिम होती. दरम्यान 1947 मध्ये जेव्हा पाकिस्तानच्या आदिवासी मिलिश्यांनी काश्मीरवर आक्रमण केलं. त्यावेळी त्यांनी भारताकडे मदत मागितली. भारत सरकार लष्करी मदतीसाठी तयार होते, पण हरि सिंह यांना जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण करावे लागेल असे भारताने म्हटले. महाराजा हरीसिंह यांनी विलीनीकरण करारावर स्वाक्षरी केली आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग बनला.