बहराइच : कोरोना वायरस सारखी जागतिक महामारी रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. पण अनेकांना याचे गांभीर्य अद्यापही कळाले नसल्याचे समोर येत आहे. आपल्या हट्टापायी काहीजण आपल्यासोबत इतरांचा जीव देखील धोक्यात टाकत आहेत. उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यामध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे. बहराइच जिल्ह्यातील महेशपूर गावातील १० जण लॉकडाऊन तोडून नमाजासाठी मशिदीत पोहोचले. यावेळी पोलिसांनी त्यांना क्वारंटाईन केले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी मशिदीतील मौलवीसह सर्व दहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. तसेच अटक केलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यांचे सॅंपल्स कोविड १९ तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. अटक केलेल्या आरोपींविरोधात आयपीसी कलम १८८, २६९, २७० महामारी अधिनियम कलम ३ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याचे कैसरगंजचे पोलीस अधिकारी जंग बहादुर यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे सध्या देशात लॉकडाऊन आहे. लोकांना घराबाहेर जाण्यास बंदी आहे, कोणताही मोठा कार्यक्रमास बंदी आहे. परंतु या सर्व निर्बंधांव्यतिरिक्त कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांचे शुक्रवारी मोठ्या थाटामाटात लग्न झालं. निखिल कुमारस्वामीचे लग्न बंगळुरूच्या रामनगरमध्ये अत्यंत रॉयल पद्धतीने झाले. येथे मीडियावर बंदी होती.
विवाहाबद्दल आता अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारण एकीकडे लोकांना देशभर सामाजिक अंतर राखण्यास सांगितलं जात आहे. दुसरीकडे व्हीव्हीआयपी सवलत दिली जात आहे.
एचडी कुमारस्वामी यांचे पुत्र निखिलचे लग्न काँग्रेस सरकारमधील माजी मंत्री एम. कृष्णाप्पा यांची भाची रेवतीशी झाले. मीडियाला येथे परवानगी नव्हती. रामनगरमधील फार्म हाऊस येथे रॉयल वेडिंगचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी जवळपास 30-40 वाहनं आली होती.