दिल्लीत प्रदूषणामुळे आरोग्य आणीबाणी जाहीर; शाळांना सुट्टी, बांधकामांवर बंदी

वायुप्रदूषणामुळे काळवंडलेल्या दिल्लीत काही फुटांपलीकडे दिसत नव्हते. त्यामुळे भर दुपारीदेखील वाहनाचालकांना दिवे लावून कार चालवाव्या लागत होत्या.

Updated: Nov 2, 2019, 08:40 AM IST
दिल्लीत प्रदूषणामुळे आरोग्य आणीबाणी जाहीर; शाळांना सुट्टी, बांधकामांवर बंदी title=

नवी दिल्ली: प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढल्याने नवी दिल्लीत आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याची वेळ आली आहे. हवेतील प्रदूषण वाढल्यामुळे दिल्लीकरांना श्वास घेणेदेखील कठीण झाले आहे. हवेची गुणवत्ता सरासरी ०-५० इतकी असेल तर हवेची गुणवत्ता श्रेणी उत्तम मानली जाते. ५१-१०० ही श्रेणी समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० घातक, ३०१-४०० अत्यंत घातक, ४०१-५०० अत्यंत गंभीर अशा श्रेणीमध्ये हवेतील प्रदूषणाची स्थिती मोजली जाते. मात्र, शुक्रवारी दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता ५००च्या वर पोहचली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. 

त्यामुळे दिल्लीतल्या शाळांना पाच नोव्हेंबरपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणात खरिपाचा हंगाम निघाल्यानंतर शेतजमिनी जाळल्या जातात. त्याचा मोठा फटका दिल्लीकरांना बसतो. शहरातली प्रदूषणाची पातळी आणखी वाढू नये यासाठी शहरातील बांधकामांवरही पाच नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

दिल्लीत वायू प्रदूषण आटोक्यात ठेवण्यासाठी रस्त्यावर पाण्याचा मारा

भारत-बांगलादेश सामन्यालाही प्रदूषणाचा फटका

दिल्लीची हवा खराब असल्याने भारत विरुद्ध बांगलादेश दरम्यान टी-२०  सामना खेळवण्यास खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरसह अनेकांनी विरोध केला होता. मात्र, सामना होणारच असल्यामुळे खेळाडूंना आपल्या तब्येतीची काळजी आहे. त्यामुळे बांगलादेशी फलंदाज लिटन दास याने चक्क मास्क लावून प्रॅक्टिस केली. 

खराब हवामानामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना अखेरच्या क्षणी रद्द करणे अशक्य आहे. परंतु भविष्यात दिवाळीनंतरच्या काही दिवसांत उत्तर भारतात सामने घेतले जाणार नाही, याची काळजी घेऊ, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केले.