Bihar Crime News : पोलिसांना झंडू बाम लावून कैदी फरार झाले आहेत. बिहारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कैद्यांना कोर्टात हजर करण्यासाठी नेले जात असताना पोलीस व्हॅनमध्येच त्यांनी अचानक सुरक्षारक्षकांवर हल्ला केला. पोलिसांच्या हातावर तुरी देत या कैद्यांनी धुम ठोकली आहे. या फरार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. सर्वत्र नाकाबंदी करून या कैद्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
फरार कैद्यांना बिहारच्या पाटणा येथील फुलवारीशरीफ कारागृहात ठेवण्यात आले होते. या कैद्यांना दिवाणी न्यायालयात हजर करण्यासाठी आणले जात होते. पण, कोर्टात पोहोचण्यापूर्वीच तिन्ही कैद्यांनी पोलिसांना झंडू बाम लावून पळ काढला. या प्रकरामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. फरार कैद्यांच्या शोधासाठी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 2.45 च्या सुमारास घडली.
पाटणा टाउन डीएसपी अशोक कुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली. फुलवारीशरीफ कारागृहातून 43 कैद्यांना पाटणा दिवाणी न्यायालयात नेले जात होते. पाटणा दिवाणी न्यायालयासमोर बीएन कॉलेजजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ई-रिक्षा आणि दुचाकी मालकामध्ये रस्त्यावर वाद सुरु होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे कैद्यांना घेवून जाणारे वाहन देखील या ट्रॅफीक जाम मध्ये अकडले. या व्हॅनमध्ये 43 कैद्यांसह 5 पोलिस होते. रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी पाहून व्हॅनमधील दोन पोलिस खाली उतरले. यावेळी तीन कैद्यांनी व्हॅनमध्ये असलेल्या तीन पोलिसांच्या डोळ्यात झंडू बाम टाकले आणि त्यांच्याशी झटापट करत धूम ठोकली.
या प्रकरणी पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला जात आहे. कैद्यांच्या झटापटीत पोलिस देखील जखमी झाले आहेत. कैद्यांना कोर्टात नेत असातान पुरेसे पोलिस कर्मचारी नव्हते का? कैद्यांकडे झंडू बाम कुठून आला? कैद्यांनी झाडाझडती घेतली जात नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.