'हवं तर भाजपचे झेंडे, स्टीकर लावा, पण मजुरांसाठी 'त्या' बसेस सोडा'

आम्ही २४ तासांपूर्वीच या मजुरांसाठी बसेसची व्यवस्था केली आहे. 

Updated: May 20, 2020, 04:46 PM IST
'हवं तर भाजपचे झेंडे, स्टीकर लावा, पण मजुरांसाठी 'त्या' बसेस सोडा' title=

लखनऊ: उत्तर प्रदेशात सध्या स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या बसेसच्या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण रंगले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि योगी सरकारमध्ये 'लेटरवॉर' सुरु आहे. दोन्ही बाजूंनी परस्परांवर कुरघोडी करणारी पत्रे पाठवली जात आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे. 

या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी बुधवारी पत्रकारपरिषद घेऊन योगी सरकारवर हल्ला चढवला. ही वेळ राजकारणाची नसून आपण स्वत:ची जबाबदारी ओळखली पाहिजे. देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशातील मजूर आपापल्या मूळगावी परतत आहेत. हे लोक फक्त भारतीयच नाहीत तर ते देशाचा कणा आहेत. ते रक्त आणि घाम गाळतात म्हणून देश चालतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. 

आम्ही २४ तासांपूर्वीच या मजुरांसाठी बसेसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेश सरकारला या बसेस मजुरांना परत आणण्यासाठी वापराव्यात. पण या बसेसना उत्तर प्रदेशच्या हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी द्यावी. हवं तर तुम्ही या सर्व बसगाड्यांवर भाजपचे झेंडे आणि स्टीकर लावा. या बसगाड्यांची व्यवस्था भाजपने केली असेही सांगा. परंतु, कृपा करुन या बस चालवण्यात याव्यात, अशी विनंती प्रियंका गांधी यांनी योगी सरकारला केली आहे. 

काय आहे प्रकरण?
काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशकडे परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी १००० बसेसची व्यवस्था केली आहे. सुरुवातीला या बसेस चालवण्यासाठी योगी सरकारने परवानगी दिली नव्हती. बऱ्याच गदारोळानंतर योगी सरकार त्यासाठी राजी झाले. मात्र, योगी सरकारने काँग्रेसकडून या १००० बसेसचा तपशील मागवला होता. काँग्रेसकडून योगी सरकारला बसगाड्यांचा वाहन क्रमांक, त्यांचे चालक असा सगळा तपशीलही पुरवण्यात आला. मात्र, यानंतर योगी सरकारने काँग्रेसने १००० बसेसची व्यवस्था केल्याचा दावा फेटाळून लावला होता. वाहनांचे क्रमांक तपासले असता यापैकी अनेक गाड्या बस नसून बाईक, कार आणि रिक्षा असल्याचे निदर्शनास आल्याचे योगी सरकारचे म्हणणे आहे.