नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांना बढती देऊन त्यांना पक्षाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आलेय. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणुका लढविण्यात येणार आहे. त्याची रणनिती आखण्यात येत आहे. मात्र, उत्तर प्रदेशमधील रायबरेलीतून काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ऐवजी त्यांची मुलगी प्रियांका गांधी-वढेरा या निवडणूक लढवतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेशाच्या पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्यात. प्रियांका गांधी या निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. २०१९ लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी या रायबरेली या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जातंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये राहुल गांधींनी ही माहिती दिली. दुसरीकडे रायबरेलीमधून सोनिया गांधी लढणार की प्रियांका हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचे राहुल यांनी यावेळी सांगितलंय.
२०१९ ची लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी अनेक पक्षांनी केली आहे. काँग्रेसने स्थानिक पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविण्यावर भर दिलाय. त्यातच लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून सोनिया गांधींच्या ऐवजी प्रियांका गांधी निवडणूक लढवतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कारण हल्ली सोनिया गांधींची प्रकृती स्थिर नसते, आणि दुसर म्हणजे पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रियांकां गांधी ही निवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने जास्त जागा मिळवल्यात. भाजपच्या विजयामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला होता. या पराभवानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान आता भाजप उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेलीवर आपले लक्ष्य केंद्रीत करणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून पुन्हा एकदा प्रियांका गांधी यांची मागणी होत आहे. काँग्रेसचे नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी यांना प्रियांका गांधी यांच्यासोबत काम करायला हवे. जर असं झालं तर काँग्रेसला विजय मिळू शकतो, अशी कबुलीच शर्मांनी दिलेय. भाजपला उत्तर द्यायचं असेल आणि जास्तीत जास्त जागांवर निवडून यायचं असेल तर प्रियांका गांधीं यांच्याशिवाय पर्याय नाही यामुळे या हालचालीना वेग आल्याचे बोलले जात आहे.