IBPS Recruitment 2024: तुम्ही बॅंकिंग सेक्टरमध्ये नोकरी शोधताय? तर मग ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण बँकिंग कार्मिक निवड संस्था म्हणजेच आयबीपीएसने बंपर भरती जाहीर केली आहे. याअंतर्गत उमेदवारांना चांगल्या पगाराची बॅंकेतील नोकरी मिळू शकणार आहे. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर याचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख,पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
आयबीपीएस भरती अंतर्गत आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. या विविध पदांच्या एकूण 896 रिक्त जागा भरल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. आयबीपीएस भरती अंतर्गत आयटी अधिकारीच्या एकूण 170 रिक्त जागा भरल्या जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतन 4 वर्षे इंजिनीअरिंग/टेक्नोलॉजी डिग्री/पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्र अधिकारीची एकूण 346 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून 4 वर्षांची डिग्री (पदवी) असणे आवश्यक आहे.
राजभाषा अधिकारीची 25 रिक्त पदे भरली जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करणे आवश्यक आहे. लॉ ऑफिसरची 125 पदे भरली जाणार असून या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एलएलबी पदवी असावी. तसेच त्यांची नोंद बार काऊन्सिलकडे असणे आवश्यक आहे. एचआर/कार्मिक अधिकारीची एकूण 25 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करणा्ऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. मार्केटिग ऑफिसरच्या एकूण 205 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण करणे आवश्यक आहे.
यासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून 21 ऑगस्ट 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 त 30 वर्षांच्या आत असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण उमेदवारांकडून 850 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. तर मागासवर्गीय उमेदवारांकडून 175 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे.